ब्रह्माळा तलाव कोमजले

तौक्ते चक्रीवादळात अनेक वृक्ष उन्मळून कोसळले १५ दिवसांनतरही वृक्षांची छाटणी आणि परिसराची साफसफाई नाही ठेकेदार फरार, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कानावर हात

 ठाणे –  तलावांचे शहर म्हणून ठाणे ओळखले जाते. या तलावांच्या सौंदर्यिकरणासाठी करोडो रुपये ठाणे महापालिका खर्च करते. मात्र त्याची निगा राखण्यात पालिका प्रशासन अपुरे पडत असल्याची बाब आता उघड झाली आहे. तौक्ते चक्रीवादळात ब्रह्माळा तलाव परिसरातील अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. मात्र गेले 15 दिवसानंतरही त्याची छाटणी व तलाव परिसरात असलेल्या उद्यानाची साफसफाई झालेली नाही. याप्रकरणी स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आयुक्तांकडे तक्रार केली असून त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे.
ठाण्याच्या मधोमध ब्रह्माळा तलाव आहे. अनेक वर्षांपूर्वी या तलावाला अनधिकृत गाळेधारकांनी विळखा घातला होता. तत्कालिन आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशानंतर ब्रह्माळा तलावाबाजुला असलेला गाळेधारकांचा विळखा तोडून टाकला होता. ब्रह्माळा तलावाने मोकळा श्वास घेतल्यानंतर अनेक वर्षांपासून या तलाव आणि परिसराचे सौंदर्यिकरण केले होते. येथे चालण्यासाठी जॉगिंग ट्रक उभारला आहे. सायंकाळच्या वेळी अनेक कुटुंबे फेरफटका मारण्यासाठी येत असतात. मात्र याच तलावाची आणि परिसराची तौक्ते चक्रिवादळानंतर दुर्दशा झाली आहे. चक्रिवादळात अनेक मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. त्यामुळे येथे मॉर्निंग वॉक आणि फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांची अडचण होत आहे. वृक्ष प्राधिकरण विभागाला संपर्क साधला तर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. वृक्ष प्राधिकरण विभागाला सक्षम अधिकारी नसल्याने नियोजनाचा खेळखंडोबा झालेला आहे. तलाव परिसरात असलेल्या जॉEिगग ट्रकच्या लाद्या उखडल्या गेल्या आहेत. तलावाचा रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा झाला असून दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे. या संदर्भात वृक्ष प्राधिकरण विभागाला सतत संपर्क केल्यानंतर धावता पाहणी दौरा अधिकाऱयांनी केला मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही. वृक्ष प्राधिकरण विभागाने आमच्याकडे पुरेशी यंत्रणा सामुग्री नसल्याने आम्ही काम करू शकत नाही असे सांगितले आहे. वृक्ष प्राधिकरण विभागाच्या खैरे मॅडम यांनी यंत्रसामुग्री व मनुष्यबळ कमी असल्याने आम्ही काही करू शकत नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी खुलासा केला. तसेच फायर ब्रिगेडचे श्री. जळके आणि आपत्कालीन व्यवस्थापनचे संतोष कदम यांचे म्हणणे आहे की, ते आमचे काम नाही तर ते गार्डन विभागाचे काम आहे. सदर विभागाशी संपर्क साधावा.  वृक्ष प्राधिकरणचे श्री. धावडे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. संबंधित ठेकेदार कोणत्याही अधिकाऱयाचे ऐकत नाही कारण त्यांना गेल्या वर्षीची बिले अजूनही मिळालेली नाही अशी ठेकेदारांची बोंब आहे. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाचा संपूर्ण ठाण्यात बोजवारा उडालेला आहे अशी माहिती कृष्णा पाटील यांनी दिली आहे.
 तलाव आणि परिसराची निगा राखण्याची ज्या ठेकेदारावर होती तो फरार आहे. पालिका आयुक्तांनीच याप्रकरणी लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे.
या तलाव परिसरात सिक्युरिटी गार्ड असूनही दोन बाकडे आणि तेथील मंदिरातील दानपेटी चोरीला गेलेली आहे. चोरी करणाऱया अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी कृष्णा पाटील यांनी केलेली आहे.
 तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सक्षम अधिकारी यांना क्लेरँट कंपनीच्या वृक्षतोड भ्रष्टाचाराचा आरोप करून दोष ठेवून बाजूला केले व आपल्या मर्जीतील खानपान ठेवणारे, आयुक्तांची इच्छा पूर्ण करणारे निक्रिय अकार्यक्षम अधिकारी यांना दर्जा नसतानाही पदोन्नती दिली तर सक्षम कार्य करणाऱया अधिकाऱयांवर दोषारोप करून बदली केली. आज वृक्ष प्राधिकारण विभागावर सक्षम अधिकारी नसल्याने ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण विभागाचा बोजवारा उडाला आहे. या विभागात कोणताही अधिकारी काम करण्यास असमर्थता दाखवत आहे, तक्रार करूनही कोणीही दखल घेत नाही. अशा चुकीच्या कारभारामुळे कोणताही अधिकारी पुढे येऊन काम करण्यास तयार होत नाही अशी माहिती कृष्णा पाटील यांनी दिली आहे.

 314 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.