४ गावांना नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी शिवसेनेमुळेच मिळणार – रमेश पाटील

ठाणे – नवी मुंबईतून वगळलेल्या १४ गावांना नळपाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी सन २०१४ पासून शिवसेना सातत्याने पाठपुरावा करीत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विलंबामुळे अपूर्णावस्थेत असलेली पाणीपुरवठा योजना जिल्हापरिषदेच्या माध्यमातून पूर्णत्वास येत असून शिवसेनेच्या पाठपुराव्यातून १४ गावांपैकी दहा गावांना महिन्याभरात पाणीपुरवठा सुरु होईल अशी माहिती जि. प. सदस्य रमेश पाटील यांनी दिली आहे.  
सन २०१४ साली दहिसर गोठेघर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना शिवसेनेच्या प्रयत्नामुळे मंजूर झाली त्यासाठी ६ कोटी ४२ लक्ष रुपयांचा निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. चौदा गावांपैकी १० गावामध्ये जलकुंभ उभारण्यात आल्यानंतर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठा योजनेला विलंब होत गेला. सदर योजनेला ठेकेदारास काम पूर्ण करण्याचा २ वर्षांचा कालावधी होता. मात्र सदर ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने जीवन प्राधिकरणाने ठेकेदारावर दंड आकारला. त्याविरोधात ठेकेदाराने न्यायालयात दाद मागितली. अखेरीस न्यायालयाने ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकले. त्यामुळे चौदा गाव नळ पाणी पुरवठा योजना चार वर्षे रखडली. इमजीपी व ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे ही योजना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद, ठाणे यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे जिल्हापरिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली.
पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी चौदा गाव पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामीण पाणीपुरवठा टंचाई मधून १ कोटी ७४ लक्ष २९ हजार ६०१ रुपयांना मंजुरी दिली. सदर योजनेवरील जुनी पाईपलाईन वेळोवेळी फुटत असल्यामुळे पाणी वाया गेल्यामुळे एमआयडीसीकडून ४९ लाख रुपयांचे व्याज व विलंब शुल्क आकारण्यात आले होते. माजी आमदार सुभाष भोईर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे पाणीपुरवठा योजनेवर आकारण्यात आलेले व्याज व विलंब शुल्काची रक्कम माफ करून मुद्दलाची रक्कम ४ लाख २१ हजार रुपये पाच ग्रामपंचायतीनी भरून बिलाची रक्कम देखील पूर्ण केली आहे.
सद्यस्थितीत १४  गावांपैकी दहिसर, नावाली, दहिसर मोरी, मोकाशीपाडा, भंडार्ली, नागांव, उत्तरशिव, कर्मनगरी, पिंपरी, निघू या गावांतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. उर्वरित नारिवली, बाळे, वाकळण व बामाली या चार गावांना देखील नळपाणी पुरवठा योजनेद्वारे लवकरच पाणीपुरवठा देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले आहे.

 347 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.