महापालिकांनी लसीकरणासाठी लसखरेदी करावी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे – कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करण्यावर राज्य शासनाने सर्वतोपरी लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत आहे. सध्या लशीची पुरवठ्यात काही अडथळे येत असल्यामुळे एमएमआर प्रदेशातील महापालिकांनी आपल्या स्तरावर लसखरेदी करून नागरिकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
केंद्र तसेच राज्य सरकारकडून लसीचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.  मात्र, मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्यामुळे महापालिकांवरही ताण येत आहे. यावर मार्ग म्हणून महापालिकांनी स्वतःच्या स्तरावर लसखरेदी करावी, असे निर्देश शिंदे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल या महापालिकांना दिले आहेत. मुंबई महापालिकेने अलिकडेच ५० लाख लसींच्या खरेदीसाठी जागतिक निविदा प्रक्रिया राबवली आहे. याच धर्तीवर एमएमआरमधील सर्व महापालिकांनी आपल्या शहरांमधील नागरिकांसाठी आवश्यक लसीचे प्रमाण आणि सरकारकडून होणारा पुरवठा याचा अंदाज घेऊन येणारी तूट भरून काढण्यासाठी लस खरेदी प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत
यासंदर्भात  शिंदे म्हणाले की, राज्य सरकार लसीकरण सुरळीत व्हावे आणि लोकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी हरेक प्रयत्न करत आहे. लसींचा तुटवडा लक्षात घेऊन १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण स्थगित करण्यात आले असून ४५ व त्यापुढील वयोगटातील ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, अशांना दुसरा डोस देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल तर अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक असल्याने महापालिकांनी आपल्या स्तरावर लसखरेदी प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 273 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.