चार टक्के द्या, मगच काढू पगार

ट्राफिक वार्डनचे १० महिन्यांचे वेतन रखडवले अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा-आमदार संजय केळकर

ठाणे – ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार आणि लाचेची अनेक प्रकरणे उघडकीस येत असून चार टक्क्यांसाठी ट्राफिक वार्डनचा १० महिन्यांचा पगार अधिकाऱ्यांनी रखडवल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून पगार अदा करण्याची मागणी केली आहे.

लाच लुचपत आणि भ्रष्टाचाराच्या घटनांनी ठाणे महापालिका सतत चर्चेत असताना ९० ट्राफिक वार्डनचे १० महिन्यांचे वेतन अदा करण्यासाठी अधिकारी चार टक्के मागत असल्याच्या आरोपाने पालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ठाणे महापालिकेतर्फे ऑक्टोबर २०१९ ते जुलै २०२० या कालावधीत ९० ट्राफिक वार्डन काम करत होते. त्यांना अद्याप वेतन अदा करण्यात आलेले नसल्याने त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली. कोविडच्या काळात अडचणीत असलेल्या या कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदन दिले होते. गेले १० महिने आम्ही फेऱ्या मारत आहोत, पण दाद दिली जात नाही. उलट चार टक्के कमिशन द्या, मगच वेतन काढू, अशी मागणी केली जात असल्याचा आरोप या वार्डननी निवेदनात केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आ.केळकर यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची तत्काळ भेट घेतली. कोरोना काळात जीवावर उदार होऊन  काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्याकडूनच कमिशन घेणे म्हणजे निंदनीय आहे. आधीच टक्केवारी मुळे पालिका बदनाम झाली आहे. त्यात पगारासाठी चार टक्के कमिशन मागितले जात असेल तर संतापजनक आहे, असे आ.केळकर म्हणाले. या प्रकरणी ९० ट्राफिक वार्डनचे वेतन तत्काळ अदा करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

 313 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.