मुंबई प्रमाणे ठाण्यातील खाजगी रुग्णालयांना लस उपलब्ध करुन द्या

महापौर नरेश गणपत म्हस्के यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

ठाणे –  मुंबईतील अपोलो, सेव्हन हिल्स, नानावटी, रिलायन्स आदी खासगी रुग्णालयांमध्ये कंपनीच्या माध्यमातून थेट लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे याच धर्तीवर ठाण्यातील अनेक खाजगी रुग्णालयांनी थेट लस खरेदी करुन लसीकरण करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु संबंधित कंपन्यांनी ठाण्यातील खाजगी रुग्णालयांनी केलेल्या मागणीचा विचार केलेला नाही. याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे लक्षवेधीत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या रुग्णालयांना लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. याबाबतचे पत्र  ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील महापौरांनी दिले आहे.
 कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आपल्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत नियोजनबद्ध अशा उपाययोजना राबवून कोरोनावर मात करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये राबविलेल्या पॅटर्नची केंद्रीय आरोग्य विभागाने देखील घेवून कौतुक केले आहे ही निश्चितच आम्हा कार्यकर्त्यांसाठी भूषणावह अशी बाब असल्याचे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.

 कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम विविध टप्प्यात महाराष्ट्राभर सुरू आहे. आपण दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाण्यात देखील आम्ही हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवित आहोत. या कार्यक्रमातंर्गत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना लस देता यावी यासाठी सर्वच ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. मुंबईमध्ये लसीकरण मोहिम प्रभावी व्हावी यासाठी अनेक खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. परंतु मुंबई वगळता इतर उपनगर व जिल्ह्यांमध्ये १ मे २०२१ पासून खाजगी रुग्णालयातील लसीकरण बंद करण्यात आले आहे, त्यामुळे एक प्रकारे ठाणे शहरावर अन्याय होत असून तशी नाराजी अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.  मुंबईतील अपोलो, सेव्हन हिल्स, नानावटी, रिलायन्स आदी खासगी रुग्णालयांमध्ये कंपनीच्या माध्यमातून थेट लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याच धर्तीवर ठाण्यातील अनेक खाजगी रुग्णालयांनी थेट लस खरेदी करुन लसीकरण करण्याची तयारी दर्शविली आहे, परंतु संबंधित कंपन्यांनी ठाण्यातील खाजगी रुग्णालयांनी केलेल्या मागणीचा विचार केलेला नाही. तरी याबाबत सहकार्य मिळणेबाबत त्यांनी विनंती केली आहे.

 ठाण्यातील नामांकित खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहिम सुरू होती. त्या रुग्णालयांना पुनश्च: लसीकरण सुरू करण्यासाठी त्यांनी मागणी केल्यानुसार संबंधित कंपन्यांकडून लस उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या स्तरावरुन आदेश व्हावेत. जेणेकरुन जे नागरिक खाजगी रुग्णालयातून लस घेवू इच्छितात त्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे व आपले लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच मध्यंतरीच्या काळामध्ये लसींचा अपुरा पुरवठा असल्यामुळे ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांचा दुसरा डोस घेण्याचा विहित कालावधी उलटून गेला आहे. अशा नागरिकांना देखील खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून दुसरा डोस घेणे सुकर होईल. तसेच खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिल्यास महापालिकेवरील लसीकरणाचा ताण कमी होण्यास देखील निश्चितच मदत होईल. त्यामुळे संबंधित कंपन्यांकडून खाजगी रूग्णालयांना लस उपलब्ध करुन देणेबाबत आदेश द्यावेत अशी विनंती  महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

 275 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.