तिजोरीत खडखडाट तरीही,आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधीचा खर्च

ठाणे –  कोरोनामुळे ठाणे महापलिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावर कोट्यवधीचा खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे.एकीकडे आरोग्यविषयक मुलभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष सुरु असताना आयुक्तांच्या ऐषोआरामी सुखसोईसाठी ठाणेकर करदात्यांच्या पैशांचा चुराडा पालिका करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. जवळपास २ कोटीच्या आसपास खर्च केला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
                      ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दीर्घ रजेनंतर पदभार सोडल्याने ऐन कोरोना काळात नविन आयुक्त विजय सिंघल यांनी पदभार स्विकारला.तेव्हा,पालिकेतील प्रशासकीय साखळीने पातलीपाडा येथील आयुक्त बंगल्याच्या नुतनीकरणासाठी पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तब्बल ५० लाखांची निविदा प्रक्रिया राबवुन आयुक्त बंगल्याच्या नूतनीकरण व दुरुस्तीचा घाट घालण्यात आला.तेव्हाही या उधळपट्टीवरून वादंग उठला होता.मात्र,बंगल्याचे काम पूर्ण होण्याआधीच  अवघ्या अडीच-तीन महिन्यात सिंघल यांची बदली झाली. त्यानंतर जून २०२० अखेरीस ठामपा आयुक्तपदी डॉ.विपीन शर्मा विराजमान झाले.डॉ.शर्मा यांनी पदभार स्विकारला तेव्हा ठाण्यात कोरोनाचा कहर सुरू होता. कोरोना उपाययोजनासाठी नगरसेवकांनी एक महिन्याचे वेतन व नगरसेवक निधीदेखील दिला होता. तरीही, प्रशासनाने घोडबंदर रोडवरील पातलीपाडा येथील आयुक्त बंगल्याच्या डागडुजीसाठी कोटयवधीचा खर्च केल्याचा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. निविदेनुसार तब्बल ४९ लाख ८३ हजारांच्या या कामात बंगल्याचे वाॅटर प्रूफिंग,प्लबिंग करण्यात आले आहे.तर, बंगल्यात अन्य काही सुखसोईसाठी लाखोंचा खर्च केल्याचे समजते.तत्कालीन आयुक्त जयस्वाल यांच्या काळातही आयुक्त बंगल्यावर लाखोंची उधळपट्टी केली होती.तरीही पुन्हा कोट्यवधी खर्च करण्यापेक्षा आयुक्तांनी या खर्चाला कात्री लावून कोरोनाविषयक कामे करण्यास प्राधान्य देणे गरजेचे होते. असे मत संदीप पाचंगे यांनी व्यक्त केले आहे.

निविदा प्रक्रियेत गडबड 

सर्वसाधारणपणे निविदा भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जातो.अत्यावश्यक कामासाठी हा कालावधी सात दिवसांचा असतो.त्याच धर्तीवर बंगल्याच्या कामासाठी सात दिवसात निविदा मागवल्याचे समोर आले आहे.डागडुजी करण्यापुर्वी बंगल्याचे स्ट्रक्चर आॅडिट झाले आहे का,कोरोना उपचारांसाठी आवश्यक असलेल्या साहित्य खरेदीला काटेकोर नियम मग बंगल्याच्या दुरूस्तीला मुभा का ? असे सवालही संदीप पाचंगे यांनी उपस्थित केले आहेत.

 857 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.