“शिवछत्रपती पुरस्कार” प्राप्त जेष्ठ संघटक नथुराम पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या स्थापनेपासून ते त्या संघटनेचे प्रमुख कार्यवाह म्हणून कार्यरत होते.जवळपास चार दशके त्यांनी या पदावर काम केले. रायगडच्या कबड्डीला प्रगती पथावर नेण्यास त्याचे कुशल मार्गदर्शन महत्वाचे ठरले.
मुंबई : “शिवछत्रपती पुरस्कार” प्राप्त जेष्ठ क्रीडा संघटक नथुराम पाटील यांचे आज १० मार्च रोजी पहाटे ३-००च्या सुमारास वृद्धपकाळाने रहात्या घरी निधन झाले. निधनासमयी ते ८३वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी रत्नप्रभा, २ मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. त्यातुन ते सावरले नव्हते. त्यामुळे त्यांचे क्रीडाक्षेत्रातील काम थंडावले होते. गेले सात-आठ दिवस त्यांचा आजार जास्त बळावला व त्यातच त्यांचा अंत झाला.
रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या स्थापनेपासून ते त्या संघटनेचे प्रमुख कार्यवाह म्हणून कार्यरत होते.जवळपास चार दशके त्यांनी या पदावर काम केले. रायगडच्या कबड्डीला प्रगती पथावर नेण्यास त्याचे कुशल मार्गदर्शन महत्वाचे ठरले. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत देखील त्यांनी उपाध्यक्ष, पंच समिती अध्यक्ष, महाराष्ट्र पुरुष संघाचे व्यवस्थापक आदी पदावर यशस्वीपणे काम केले. कबड्डीच नव्हे, तर खो-खो, कॅरम, कुस्ती, ऍथलेटिक आदी खेळांच्या संघटनेवर देखील त्यांचा पदाधिकारी म्हणून वावर होता. या त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना २००६-०७ चा संघटक म्हणून “शिवछत्रपती पुरस्कार” दिला होता. त्यांचे घर म्हणजे विविध क्रीडा संघटनेचे जणु कार्यालयच होते.
“रायगडच्या कबड्डीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे व आम्हा सर्वाना योग्य मार्गदर्शन करणारे आमचे थोर संघटक हरपले”. अशा शब्दात रायगड जिल्हा व महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचेचे सचिव आस्वाद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजच दुपारी ११-३० च्या सुमारास पेझारी- अलिबाग येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या नातेवाईका बरोबरच विविध क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

 301 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.