पूजा दानोळेची सोनेरी मालिका कायम

महाराष्ट्राने दुसऱ्या दिवशी दोन रौप्य आणि तीन ब्रॉंझपदकांचीही कमाई केली.

पनवेल : राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने आपली सोनेरी मालिका कायम राखली. महाराष्ट्राने दुसऱ्या दिवशी दोन रौप्य आणि तीन ब्रॉंझपदकांचीही कमाई केली.
पनवेल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजाने मोठ्या विश्रांतीनंतर स्पर्धात्मक पातळीवर परतताना आपली क्षमता आणि जिद्द देखिल कायम असल्याचे दाखवून दिले. गेल्या वर्षी खेलो इंडियात सुवर्ण चौकार मारणाऱ्या पूजाने आज मास स्टार्ट शर्यतीत सुवर्ण यश मिळविले. तिने २० कि.मी. अंतर ताशी ३९.२५ कि.मी. वेगाने सायकलिंग करताना ३९ मिनिट ४०.२०० सेकंद अशी वेळ देत ही कामगिरी केली. कर्नाटकाची अक्षता भूतनलाल रौप्य, तर पंजाबची जसमीक कुमार सेकॉन ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.
याच स्पर्धा प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्राचा वरद पाटिल रौप्यपदकाचा मानकरी ठरला. ही शर्यत हरियानाच्या नीरज कुमार याने ५० मिनिट ४१.००० सेकंद वेळ देत जिंकली. तेलंगणाचा आशिर्वाद सक्सेना ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. महिलांच्या सांघिक ३० कि.मी. टाईम ट्रायल शर्यतीत महाराष्ट्राच्या खेळाडू रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या. त्यांचा वेग रेल्वेला गाठू शकला नाही. रेल्वेला आव्हान देताना त्यांचे सुवर्णपदक केवळ ७ सेकंदकाने हुकले. रेल्वेने ४७ मिनिट ००.८४६ सेकंद वेळ दिली. त्यांचा एकत्रित सायकलिंगचा वेग प्रति कि.मी. ३८.२९ इतका राहिला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ३८.२० वेगाने सायकलिंग केले. पण, त्या रेल्वेपासून सात सेकंद दूर राहिल्या. महाराष्ट्राच्या प्रणिता सोमण, मधुरा वाईकर, अंजली रानवडे आणि प्रियंका कारंडे या चमूने ४७ मिनिट ०७.४५१ सेकंद अशी वेळ दिली. कर्नाटकला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या कुमार गटात आयुष खुराना, सरोश मुंड्रोइना, सिद्धेश पाटिल आणि सिनक्लेअर डिसूझा या चमूला ३० कि.मी. अंतराच्या सांघिक टाईम ट्रायल शर्यतीत ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी ४१ मिनिट ४४.०८७ सेकंद अशी वेळ दिली. राजस्थानच्या चमूने सुवर्णपदक मिळविताना ३९ मिनिट ५२.४२८ सेकंद अशी वेळ दिली. हरियाना रौप्यपदकाचे मानकरी ठरले. महिलांच्या याच अंतराच्या सांघिक टाइम ट्रायल स्पर्धा प्रकारात महाराष्ट्र ब्रॉंझपदकाचे मानकरी ठरले. त्यांनी ३३ मिनिट २७.९१० सेकंद अशी वेळ दिली. हरियानाच्याच मुली सुवर्ण, तर कर्नाटकाच्या मुली रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या.
गेल्याच महिन्यात राष्ट्रीय माउंट बाइकिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या अदिप वाघला वैयक्तिक टाईम ट्रायलच्या १० कि.मी शर्यतीत ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. त्याने १५ मिनट २७.९२९ सेकंद अशी वेळ दिली. राजस्थानचा बजरंग सुवर्ण, तर कर्नाटकाच्या सुजल जाधव रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
दुसऱ्या दिवशी पुरुषांची ४० कि.मी. अंतराची सांघिक टाईम ट्रायल ही एकमेव शर्यत झाली की ज्याच्यात महाराष्ट्राला पदापासून वंचित रहावे लागले. दिवसातील अन्य सहा शर्यतीत महाराष्ट्राने किमान एक पदक पटकावे. या शर्यतीत पंजाबने ५१ मिनिट २५.१८८ सेकंद वेळ देत सुवर्णपदक मिळविले. रेल्वे रौप्य, तर कर्नाटक ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.

 347 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.