जनता विचारतेय… मोदीजी उत्तर द्या!

भाजप कार्यालयासमोरच फलक लावून राष्ट्रवादीचा जोरदार टोला

ठाणे : इंधन महागले …. प्रवास करणार कसे?; अन्नधान्य महागले… विकत घेणार काय?; सिलिंडर महागले …. अन्न शिजवणार कसे?, असे सवाल उपस्थित करणारे प्रश्न असलेला फलक चक्क भाजप कार्यालयासमोरच लावून “ असह्य होतेय महागाईची मार… पळवून लावू मोदी सरकार” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे. दरम्यान, या बॅनसबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी, ‘बहुत हुई महँगाई की मार , अब की बार मोदी सरकार’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या मोदींना जनतेकडूनच “ बहुत हुई महँगाई की मार, भगाओ मोदी सरकार’ असा टोला लगावला. 
केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलचे दर ९८, डिझेलचे ८९ तर घरगुती सिलिंडरचे दर ८१९  रुपयांवर गेले आहेत. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर जास्त होते. त्यावेळी म्हणजेच आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर स्थिर होते. मात्र, आता क्रूड ऑईलचे दर आवाक्यात असतानाही इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत. या फलकावर “ जबाब दो” असे म्हणत शिजवायचे कसे, खायचे काय, प्रवास करायचा कसा? असे प्रश्न उपस्थित करीत पंतप्रधान मोदी यांनी आता उत्तर द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.
या संदर्भात आनंद परांजपे हे सदर होर्डींग्ज लावलेल्या ठिकाणीच पत्रकारांशी म्हणाले की, आज ठाण्यात वाढलेल्या इंधन दराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘जबाब दो.. जबाब दो’ असा मजकूर असलेले होर्डींग्ज सबंध ठाणे शहरात लावण्यात आलेले आहेत. सन २०१३-२०१४ मध्ये सरासरी ११० डॉलर्स प्रती बॅरल असे क्रूड ऑईलचे दर असतानाही तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय जनतेला ७० ते ७२ रुपयात पेट्रोल आणि  ५० ते  ५२ रुपयांत डिझेलचे वितरण केले होते. आता सरासरी ६४ डॉलर्स प्रती बॅरल असा क्रूड ऑईलचा दर असतानाही पेट्रोल ९७ रुपये ८७ पैसे तर डिझेल  ८८.५८ रुपये दराने वितरीत केले जात आहे. घरगुती सिलिंडरचे दर ८१९ रुपयांवर गेले आहेत. अशा स्थितीमध्ये अन्न शिजवायचे कसे? डाळींचे दर १०० रुपयांवर गेले आहेत. म्हणजेच आता खायचे काय? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पंतप्रधान केवळ आपल्या मन की बात ऐकवण्यात मग्न आहेत. त्यांना जनतेच्या मनातील प्रश्न ऐकण्यात स्वारस्य नाही.  त्यांनी आता जनतेची ‘मन की बात’ ऐकावी, यासाठी हे बॅनर लावलेले आहेत. ‘बहुत हुई महँगाई की मार , अब की बार मोदी सरकार’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या मोदींना जनतेकडूनच “ बहुत हुई महँगाई की मार, अब भगाओ मोदी सरकार’ असा टोला लगावला जात आहे, असेही परांजपे यांनी सांगितले.

 491 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.