जीएसटीच्या जाचक तरतुदीच्या विरोधात कॅटने २६ फेब्रुवारी रोजी दिली होती बंदची हाक
मुंबई : कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने २६ फेब्रुवारी रोजी केलेल्या भारत बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर कॅट आणि सरकार यांच्यात चर्चा सुरु झाली. कॅट आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेयर असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आज वित्त सचिव अजयभूषण पांडेय, केंद्रिय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष पी सी मोदी यांच्यासोबत पहिली आणि दुसरी बैठक केंद्रिय अप्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष एम अजितकुमार यांच्या सोबत झाली. कॅटच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण खंडेलवाल यांनी केले. या शिष्टमंडळात ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेयर असोसिएशनचे राष्ट्रीय चेअरमन प्रदीप सिंघल, कॅटच्या वस्तू सेवा कर समितीच्या अध्यक्षा पूनम जोशी सहभागी झाल्या होत्या. या चर्चेदरम्यान अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जीएसटी आणि देशभरात कर प्रशासनाची कार्यशैलीमुळे संबधित व्यापाऱ्यांना आणि मालवाहूतुकदारांना होणाऱ्या समस्यांबद्दल एक निवेदन अधिकाऱ्यांना दिले असल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेलफेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
सुरेशभाई ठक्कर म्हणाले, दोन्हीही बाजूने यावेळी सकारात्मक चर्चा झाली. परंतु या चर्चमधून काहीही निर्णय न झाल्याने २६ फेब्रुवारीला भारत बंद करण्यावर कॅट ठाम आहे. या चर्चेदरम्यान प्रविण खंडेलवाल यांनी गुजरातमध्ये कर अधिकाऱ्यांनी वापीमध्ये व्यापाऱ्यांना केलेल्या मारहाणीत सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा उपस्थित केला. सीबीआईसीचे अध्यक्ष एम अजितकुमार यांनी सांगितले, आज त्यांनी पोलीस महानिरीक्षकाकडून त्या दुदैवी घटनेचा अहवाल मागितला असून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. व्यापाऱ्यांसोबत कुठल्याही स्वरूपाचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय न्यायव्यवस्था आणि कायद्यांची पायमल्ली करणाऱ्यांना माफ न करण्याबद्दल यावेळी दोन्ही बाजूंचे एकमत झाले. याशिवाय बोगस बिलाद्वारे गैरव्यवहार करणाऱ्यांना मोकाट सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई करणार. सचोटीने व्यापार करणाऱ्यांसाठी अशी लोक सैतानासमान असल्याचे सांगितले.
678 total views, 1 views today