तेरणा वैद्यकीय महाविद्यालयातर्फे कामोठे येथे मोफत ओपीडी सेवा

पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते झाले उद्घाटन

नवी मुंबई : गेल्या वर्षभरापासून भारतातील संपूर्ण जनता कोरोनाशी लढत असून आजही ही लढाई सुरु आहे. या लढाईत अनेक नागरिकांचा बळी गेला असून आजही  आपण कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहोत. कोरोना महामारीमुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे, अनेक नागरिकांचे उद्योगधंदे बंद झाले असून खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशातच जर एखादा गंभीर आजार झाला तर संपूर्ण कुटुंबाचीच परवड होऊ शकते, याच जाणिवेतून नवी मुंबई ,पनवेल रायगड जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या नेरुळ येथील  तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च हॉस्पिटलने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना पनवेल महानगरपालिकेच्या माध्यामातून मदतीचा हात पुढे केला आहे. कामोठे सेक्टर ८ येथे पनवेल महानगर पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाने मोफत ओपीडी सेवा देण्यास सुरवात केली आहे व याचे  उदघाटन  पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल महानगर पालिका आयुक्त  सुधाकर देशमुख, तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाचे विश्वस्त मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी १२ वाजता पार पडले. कोरोना महामारीची लढाई पनवेल महानगर पालिकेने शर्थीची झुंज देऊन लढली असली तरीही पनवेल महानगर पालिकेला आरोग्य सुविधांची अजून गरज आहे त्यामुळे अशा खाजगी व सरकारी आरोग्य यंत्रणा जर एकत्र आल्या तर पनवेल महानगर पालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या गरीब व गरजू नागरिकांना याची नक्कीच मदत होईल असे मत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी व्यक्त केले. तेरणा वैद्यकीय महाविद्यालया तर्फे स्त्रीयांचे आजार, त्वचारोग, बालरोग, अस्थिव्यंग, नेत्ररोग , क्षयरोग  अशा महत्वाच्या आजारांवर मोफत तपासणी होणार आहे तसेच पुढील उपचारासाठी त्याना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल येथे नेण्यात येणार असून तिथेही  महाराष्ट्र शासनाच्या सुरु असलेल्या  विविध वैद्यकीय सुविधांतर्गत माफक व मोफत उपचार केले जातील. या कार्यक्रमाला तेरणा समूहाकडून पी डी देशमुख, श्री संतोष साईल, तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. सुनील पेटकर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. लोहारे, माजी आरोग्य सभापती डॉ. अरुण भगत, नगरसेविका अरुणा भगत, स्थानिक नगरसेविका श्रीमती संतोषी तुपे तसेच पनवेल महानगर पालिकेतील सदस्य, डॉक्टर व परिचारिका उपस्थित होत्या.

 404 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.