आगामी काळात मोठ्या आंदोलनासाठी तयार रहा

कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण खंडेलवाल यांचे व्यापाऱ्यांना आवाहन, कॅटची मुंबई विभागीय बैठक संपन्न

मुंबई : वस्तूसेवा कर, एफ ए एस आय, एपीएमसी आणि लीगल मेट्रोलॉजी आदी कायद्यांमध्ये असलेल्या त्रुटी आणि अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या दंड आकारणीच्या अधिकारामुळे भ्रष्टाचार फोफावला असून आगामी काळात व्यापाऱ्यांनी मोठया आंदोलनासाठी तयार रहावे असे आवाहन कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट)राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण खंडेलवाल यांनी केले आहे. कॅटच्या मुंबई विभागाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना प्रविण खंडेलवाल यांनी हे आवाहन केले असल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
यावेळी प्रविण खंडेलवाल यांनी सदस्य व्यापाऱ्यांना वस्तूसेवा कर आणि विविध कायद्याच्या जाचक अटीबाबत व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. नागपूर येथे ८ ते १० फेब्रुवारीदरम्यान कॅटच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पुढील रणनितीबाबत चर्चा होणार असल्याचे प्रविण खंडेलवाल म्हणाले. यावेळी मागील काही दिवसांत कॅटने चिनी मालाविरुद्ध, मनमानी कारभार करणाऱ्या ई कॉमर्स कंपन्या, व्हॉट्सअप आणि फेसबुक द्वारे भारतीयांच्या वैयक्तिक माहितीवर गदा आणण्याचा प्रयत्नाविरुद्ध कॅटने सोशल मीडियावर जनजागृती करत मिळवलेल्या यशाची माहिती देण्यात आली असल्याचे सुरेशभाई ठक्कर म्हणाले.
कॅटचे मुंबई विभागीय अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी बोलताना शंकरभाई ठक्कर यांनी कॅटच्या पुढील आंदोलनासाठी व्यापारी सज्ज असल्याची ग्वाही दिली. कॅटचा कल्याण, भिवंडी भागात विस्तार करण्यासाठी होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची तयारी यावेळी प्रविण खंडेलवाल यांनी दर्शवली. या विभागीय बैठकीसाठी कॅट महाराष्ट्रचे सरचिटणीस महेश बखाई, उपाध्यक्ष सुरेशभाई ठक्कर, व्हाईस चेअरमन जयेश जरीवाला, कॅट महाराष्ट्र इंडस्ट्रीयल सेलचे अध्यक्ष पारश शहा, राज्य संघटन मंत्री अमरशी कारिया, महानगर सरचिटणीस तरुण जैन, वरिष्ठ सदस्य जगदिश अग्रवाल यांच्यासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आदी ठिकाणाहून व्यापारी या बैठकीला उपस्थित होते. कॅट मुंबई विभागाचे व्हाईस चेअरमन दिलीप माहेश्वरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 535 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.