चव्हाण की राऊत

विधानसभाध्यक्ष पदाकरिता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची नावे आघाडीवर

मुंबई : राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या ठिकाणी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला प्रथम पसंती असून त्यांच्या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नावाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उचलबांगडी होणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. राज्यात काँग्रेसचे आक्रमक नेतृत्व असावे आणि भाजपाबरोबर आघाडीतील इतर पक्षांनाही कटशाह देण्यासाठी एका सक्षम नेत्यांची गरज नवी दिल्लीतील नेत्यांना आहे. त्यामुळे विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला दिल्लीतील नेत्यांनी पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कोअर ग्रुपमधील राजीव सातव यांच्या नावाची चर्चा होती. परंतु आता काँग्रेसचे अध्यक्ष पद स्विकारण्यासाठी राहुल गांधी यांनी तयारी सुरु केल्याने सातव यांना महाराष्ट्रात पाठविण्याचे रद्द करण्यात आले. त्यामुळे नाना पटोले यांचे नाव पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नावे पुढे आली आहेत. या दोघांपैकी एकाची विधानसभाध्यक्ष पदी नियुक्ती करण्याचा विचार सुरु असून या पदासाठी या दोन नावांचीच चर्चा दिल्ली दरबारी सुरु असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

 290 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.