ठाणे महापालिकेचा २७०० थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा

मालमत्ता करवसुली मोहिमेस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात जे निवासी करदाते आपला थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित जमा करतील त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीच्या रकमेवर १०० टक्के सवलतीची योजना सुरू केली आहे. या योजनेस करदात्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असून करदात्यांनी करापोटी अद्यापपर्यत ४३४.८६ कोटी इतका महसूल महापालिकेकडे जमा केला आहे. या योजनेबरोबरच महापालिकेने थकबाकींदारावर मालमत्ता कर वसुलीसाठी कारवाईचा धडाका लावला असून सर्व प्रभागस्तरावरुन एकूण २७३६ मालमत्तांना जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेने सुरू केलेल्या या सवलत योजनेचा लाभ अद्यापपर्यंत १९७८६ करदात्यांनी घेतला असून अद्याप काही थकबाकीदार करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे दिसून येते. या सवलतीचे काही दिवस शिल्लक असून करदात्यांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांवर वॉरंट, जप्ती , लिलावाद्वारे मालमत्तेची विक्री यासारखी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ताधारकांना आपला थकीत मालमत्ता कर भरता यावा याकरिता ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभागस्तरावरील संकलन केंद्रे ३१ जानेवारीपर्यत सर्व शनिवारीही सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 435 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.