जीएसटी ठरलीय व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी

देशव्यापी आंदोलन छेडण्याचा कॅटचा इशारा

मुंबई : वस्तू सेवा कराच्या सद्यस्थितीबद्दल व्यापाऱ्यांचा रोष वाढू लागला आहे.देशातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने यासंदर्भात देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा मोदी सरकारला दिला आहे. वस्तू सेवा करात मनमानी बदल केल्यामुळे ही करप्रणाली व्यापाऱ्यांसाठी छळवाद ठरत असल्याचा आरोप कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेअर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी केला आहे.
पुढील महिन्यात ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान कॅटचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होणार आहे. या अधिवेशनात आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येईल. या अधिवेशनात देशातील २०० हुन अधिक व्यापारी नेते सहभागी होणार असल्याचे सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया आणि सरचिटणीस प्रविण खंडेलवाल यांनी यासंदर्भात मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भरतीया आणि खंडेलवाल म्हणाले, मोदी सरकारच्या दूरगामी योजनांचे आम्ही स्वागत करतो.पण या योजनांची अंमलबजावणी प्रक्रिया व्यापाऱ्यांसाठी कटकटीची ठरली आहे.वस्तू सेवा कराची सद्यस्थिती या कराच्या मूळ उद्देशालाच बगल देत आहे. साधी सरळ अशी वस्तू सेवा करप्रणाली आता व्यापाऱ्यांसाठी अप्रिय आणि डोईजड ठरली आहे.
वस्तू सेवा कराची पूर्तता करणे व्यापाऱ्यांसाठी कठीण झाले आहे. कोरोना महामारीमुळे आधीच विस्कळित झालेला व्यवसाय सावरताना व्यापाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अडचणींचा सामना करत देशातील व्यापारी वर्षाकाठी ८० लाख कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत. आठ कोटी व्यापारी ४० कोटी लोकांना रोजगार देत आहेत. कॅटच्या तीन दिवसीय अधिवेशनात ई कॉमर्स व्यापार, प्रस्तावित ई कॉमर्स व्यापाऱ्यांचे धोरण, मुद्रा योजनेचे मूल्यांकन आणि इतर विषयांवर चर्चा होणार आहे.

 481 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.