बोंद्रेपाड्याला मिळणार मुबलक पाणी

जिल्हापरिषद सदस्या कांचन साबळे यांनी केला होता पाठपुरावा

शहापूर : शहापूर तालुक्यातील खराडे ग्रामपंचायत हद्दीतील बोंद्रेपाड्याला सतत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कित्येक वर्षांपासून येथील महिलांना डोक्यावर हंडे कळशीने दूरवरून पाणी आणावे लागत होते.येथील जिल्हा परिषद सदस्या कांचन साबळे यांच्या प्रयत्नाने आता या गावासाठी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून तिचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले
शहापूर तालुक्यातील खराडे ग्रामपंचायतची जुनी नळपाणी पुरवठा योजना असून त्याच योजनेतून बोंद्रेपाड्याला पाणीपुरवठा करण्यात येतो.जुनी पाईपलाईन सहा इंच व्यासाची सिमेंटची असून ती शेतातून जमिनीखालून नेली आहे.नांगर किंवा ट्रॅक्टरमुळे ती जागोजागी फुटल्याने बोंद्रेपाड्याला सतत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असे.पाईपलाईन दुरुस्ती ग्रामपंचायतला परवडत नसल्याने व पाणीच मिळत नसल्याने फुकटची पाणीपट्टी का भरायची अशीही ग्रामस्थांची तक्रार होती.
या गावातील महिला शेणवे-डोळखांब रस्त्याच्या कडेला असलेल्या खराडे आरोग्य उपकेंद्रातील विहिरीतून डोक्यावर हंडे कळशीने पाणी आणत होत्या.यात त्यांचा वेळ वाया जात असे,शिवाय पाणी अशुद्ध असल्याने आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या, या सर्व बाबींचा विचार करून किन्हवली जिल्हा परिषद गटाच्या सदस्या कांचन साबळे यांनी ५५ घरांचे व २८० लोकसंख्या असलेल्या बोंद्रेपाड्यासाठी सुमारे २४ लाख रुपयांची स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली असून तिचे भूमिपूजन नुकताच संपन्न झाले.या वेळी योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी दिल्या आहेत त्यांचेही ऋणनिर्देश म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य बोंद्रेपाड्याला अभियंता हिरासिंग भस्मे, जिल्हा परिषदेच्या सदस्या कांचन साबळे, पंचायत समितीच्या सदस्या शारदा रसाळ,अविनाश साबळे , योगेश रसाळ ,पोलीस पाटील संतोष पडवळ ,रवीदादा चौधरी , स्वप्नील भेरे, ग्रामपंचायत सदस्य किशोर बोंद्रे, तानाजी बोंद्रे, गणेश बोन्द्रे ,दीपक रसाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील महिलांना आता काही दिवसांनी मुबलक पाणी मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली होती.

 331 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.