धनंजय मुंडे राजीनामा द्या

ठाणे भाजप महिला मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

ठाणे : सोमवारी भाजपच्या ठाणे जिल्हा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपच्या महिल्यांच्या वतीने करण्यात आली. घडलेल्या प्रकारानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी केली.
सोमवारी सकाळी भाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, नगरसेविका नम्रता कोळी, महिला मोर्चाच्या सर्व सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस आणि इतर महिला पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. मागील आठवडय़ापासून हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. विशेष म्हणजे मुंडे यांनी सदर महिला ही आपली दुसरी पत्नी असल्याची कुबली देखील दिली आहे. त्यांच्यापासून त्यांना मुले देखील आहेत, परंतु प्रतिज्ञा पत्रात त्यांनी खोटी माहिती दिलेली आहे, त्यामुळे हा संविधानाचा अपमान आहे. सामाजिक न्याय हे खाते ज्यांच्याकडे आहे, तेच जर अशा पध्दतीने गंभीर अपराध करणार असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा असा सवाल मृणाल पेंडसे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले असून धनंजय मुंडे यांनी आपली नैतिक जबाबदारी स्विकारुन आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
इतके दिवस हे सरकार भ्रष्टाचारी सरकार म्हणून ओळखले जात होते. परंतु आता त्यांच्याच सरकारमधील मंत्री, राष्ट्रवादीचे पदाधिकारी अशा पध्दतीने महिलांवर अत्याचार करणार असतील तर, महिला मोर्चा तीव्र आंदोलन करीत राहणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच जो र्पयत धनंजय मुंडे त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री मागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 355 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.