छत्रपती शिवाजी महाराजांनीच सुरू केली गडकिल्ले संवर्धनाची खरी चळवळ

शिवभक्त, इतिहासकार श्रमिक गोजमगुंडे यांचे रामभाऊ म्हाळगी व्याख्यान मालेत प्रतिपादन

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकावेळी नेमके किती किल्ले आणि कुठे आहेत याची कागदोपत्री नोंद आहे का..? याची माहिती महाराष्ट्रात काय तर भारतातील एकाही इतिहासकाराला नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. नोंद आहे ती फक्त शालेय इतिहासाच्या पुस्तकात.
महाराष्ट्रातील प्रत्येक गडकोट किल्यामध्ये लपलेला इतिहास ३५० वर्षाने का होईना विविध संस्थांच्या वतीने विचारवंत उलगडताना दिसत आहेत. आज या राज्यातील ३६० गडकोट किल्ले उध्वस्त होऊन अखेरच्या घटका मोजत आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या दुरावस्थेबाबत बोलत असताना जे राज्या बाहेर अर्थात कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यातील किल्ल्यांची अवस्था अतिशय वाईट असून यादुर्ग संवर्धनासाठी कोण पुढे येणार असा सवाल शिवदुर्ग अभ्यासक श्रमिकभाऊ गोजमगुंडे यांनी केला.
ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूल सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यान मालेतील सातवे पुष्प गुंंफत असताना श्रमिकभाऊ गुजमगुंडे यांनी १४ जानेवारी पानिपतचा रणसंग्राम ते गडकोट, किल्ले दुर्गसंवधर्नासाठी शिवरायांच्या मराठा शिलेदारांनी बजावलेली भूमिका या विषयावर भाष्य केले. यावेळी व्याख्यानमालेचे अध्यख व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी श्रमीकभाऊ यांना फळांची परडी देऊन सत्कार केला.
सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्ग संवर्धन चळवळ सुरू केली त्याला यश मिळत आहे असे गोजमगुंडे यांनी सांगून प्रतिष्ठानच्या माध्यमातून जंजिरा किल्ल्यावर कायम स्वरूपी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला असून ३० मार्च २०१६ रोजी एकाच दिवशी महाराष्ट्रातील ३०१ किल्यावर स्वच्छता मोहीम घेण्यात आली तर पदमदुर्ग किल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत सर्वात मोठी स्वराज्याची पताका (भगवा झेंडा) फडकविण्यात यश आले असे सांगून, दुर्गसंवर्धनासाठी लोकवर्गणी स्वीकारण्याकरिता शासनाकडे आमदार केळकर यांनी पाठपुरावा करून तसा जी आर शासनास काढण्यास लावला. या सर्व कामात कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांचे मोठे योगदान असून दुर्गसंवर्धनाच्या कामाबद्दल आमदार केळकर यांचे गोजमगुंडे यांनी कौतुक केले.
याप्रसंगी पानिपत रणसंग्रामा विषयी बोलताना पानिपतच्या युध्दात मराठे थकले नाहीत. या शिलेदारांना पुन्हा शिखरावर नेऊन ठेवण्याचे शौर्य दाखवणारा महाजी शिंदे यांची आठवण करताना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मोरारजी देशपांडे यांच्या इतकेच महत्वाचे असल्याचे श्रमिकभाऊ यांनी सांगितले. १० वर्षानंतर ज्या दिल्लीच्या तख्तावर मोगलांचा हिरवा झेंडा फडकत होता तो उतरवून शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवण्याचे सामर्थ्य महादजी शिंदे यांनी दाखवले. एवढेच नव्हे तर पानिपत युद्धात एक लाख मराठ्यानी आपले बलिदान दिले . या बलिदानंतर आजतागत या हिंदुस्थानकडे कोणाची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही हे वास्तव आहे. हे मराठ्यांचे शौर्य आहे. महादजी शिंदे पुढे आदिलशाही विजापूर राजधानी आणि मराठवाड्यातील परांदा केल्यावर देखील भगवा ध्वज फडकवला.
३५० वर्षापूर्वीचा इतिहास आठवून पाहत असताना ज्या सिंहगड किल्लाचा तट चढत गड सर केला त्या वास्तूची दयनीय अवस्था झाली आहे. हाच प्रकार विशाळगडावर बाजीप्रभू आणि मोरारजी देशपांडे यांच्या स्मारक बाबत आहे. उन्हात तळपत आणि पावसात भिजणा-या स्मारकावर एक छत अजून कोणी उभारू नये यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत श्रमिकभाऊ यांनी व्यक्त केली, पण आमच्या सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत लोकवर्गणीतून छत बांधण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली व अशा स्मारकांना भेट देणे आवश्यक आहे असे सांगितले.
महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात असणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट संवर्धनाची जबाबदारी ही केन्द्र आणि राज्य पुरातन विभागाची आहे. महाराष्ट्रात जर ४०० किल्ले गृहीत धरले तर राज्य पुरातन विभागात ५५ किल्याची तर, केन्द्रीय पुरातन विभागाकडे ४० असून या दोघांची बेरीज केली तर ९० ते ९५ किल्ले सुध्दा भरत नाही. मग प्रश्न असा आहे की उर्वरित ३०५ गडकोट, किल्ल्याच्या संवर्धनाचे काय असा प्रश्न उपस्थित होतो. याचा अर्थ केन्द्र आणि राज्याकडे नोंद असलेल्या संरक्षक स्मारकासाठी निधी आहे पण असंरक्षक स्मारकासाठी निधीची तरतूद नाही. दुर्देव असे आहे की तरतूद आहे ती मुळातच तुटपुंजी आहे, अशी खंत गोजमगुंडे यांनी व्यक्त करत असतानाच केंद्र व राज्य पुरातत्व खातं आता दुर्गसंवर्धना करिता लक्ष देत असल्याचेही सांगितले.
गडकिल्यांचा इतिहास सांगत असताना गडाचे संवर्धन करण्याची खरी चळवळ स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षापूर्वीच केली आहे. त्यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात एक लाख ५७ हजार होन (म्हणजे सोन) एवढी तरतूद करून ठेवली होती याचा आवर्जून उल्लेख केला. तर शिवरायांचा इतिहास प्रतापगडावर अफजलखानाचा वध या शिवाय पूर्ण होऊच शकत नाही आणि त्यासाठी प्रत्येक शिवप्रेमींना तिथे जाण्याचे आवाहन यावेळी गोजमगुंडे यांनी केले.

 461 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.