जिल्ह्यातील २९ केंद्र लसीकरणासाठी सज्ज

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ठाणे : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका व ग्रामीण क्षेत्रातील २९ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यासाठी ७४ हजार ‘कोविशील्ड’ या लसीचे डोस उपलब्ध झाले असुन त्यांचे ६ मनपा व ग्रामीण भागासाठी उपसंचालक कार्यालय मुंबई मंडळ ठाणे यांच्यामार्फत वितरण करण्यात आले आहे. १६ जानेवारी रोजी लसीकरणास प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून ७४ हजार डोस ठाणे जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये २९ निर्देशित लसीकरण केंद्र आहेत. यामध्ये ठाणे मनपा मध्ये ४, उल्हासनगर मनपामध्ये १, मिरा भाईंदर मनपा ४, भिवंडी निजामपुर मनपा ४, नवी मुंबई मनपा ५,कल्याण डोंबिवली मनपा ४,जिल्हा आरोग्य यंत्रणा व जिल्हा सामान्य रुग्णालय यामध्ये ७ असे २९ केंद्र आहेत. या सर्व ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.
कोविन पोर्टल नोंदणी – जिल्ह्यात आतापर्यंत कोवीन पोर्टलवर ६० हजार ८४२ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरविण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे १२ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत १५ हजार ६२७,कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मार्फत ५ हजार १४३, उल्हासनगर महानगरपालिका ४ हजार ३७४, मीरा-भाईंदर महानगरपालिका ६ हजार ३०८, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका २ हजार ६७२, नवीमुंबई महानगरपालिका १७ हजार ६८२ व ग्रामीण क्षेत्रासाठी ९ हजार ३६ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
लसवितरण – ठाणे महानगरपालिकेस १९ हजार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ६ हजार, उल्हासनगर महानगरपालिका ५हजार मीरा-भाईंदर महानगरपालिका ८ हजार, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका ३ हजार ५००, नवीमुंबई महानगरपालिका २१ हजार व ग्रामीण क्षेत्रासाठी ११ हजार ५०० याप्रमाणे लसीच्या डोसचे वितरण करण्यात आले आहे.
आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील विविध शासकीय आरोग्य संस्था स्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये ५ सदस्यांचा समावेश असणार आहे.
लसीकरणासाठी शितसाखळी – तयार करण्यात आली आहे. या शीतसाखळीत प्लस दोन ते प्लस आठ डिग्री सेल्सिअस तापमानात ही लस ठेवण्यात येणार. ही लस ठेवण्यासाठी १९० आईसलाईंड रेफ्रिजरेटर (आयएलआर) तयार ठेवण्यात आले आहेत. या आयएलआरचं तापमान दोन ते आठ डिग्री सेल्सिअस असेल. तसेच १९७ डिपफ्रीजरची व्यवस्था आहे. तसेच एकुण कोल्ड बॉक्स १९९ आहेत.तसेच २६५३० आईस पॅक उपलब्ध आहेत. या बरोबरच जिल्ह्यात ४८१४ वँक्सिन कँरियर असणार आहेत. जिल्ह्यात ८४६ वॕक्सिनेटर, ३४० पर्यवेक्षक असणार आहेत.
लसीकरणांच्या पहिल्या टप्पात केवळ आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.तरी लसिकरणाच्या अनुषंगाने कोणत्या चुकीच्या बातम्यांवर अथवा चुकीच्या सोशलमिडीयामधील संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

 581 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.