कोरोना काळात शिक्षकांनी केलेले काम अभिमानास्पद – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

विद्यासेवक पतसंस्थेच्या कार्यक्रमात केले प्रतिपादन
कल्याण : कोरोना काळात मला शिक्षकांची साथ मिळाली, घरोघरी जाऊन कोरोना सर्वेक्षणाच्या कामासह शिक्षक, इंजिनिअर यांनी डॉक्टरांची भूमिका बजावली. आपण केलेले काम अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी शिक्षकांची पतपेढीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी शिक्षकांची पतपेढी ठाणे पालघर जिल्ह्यात कार्यरत असून सात हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सभासद  आहेत. पतसंस्थेत गेल्या  ३३ वर्षांपासून सभासदांचे पाल्य व सेवानिवृत्त सभासदांचा गुणगौरव केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथील पतपेढीच्या मुख्य शाखेत प्राथमिक स्वरुपात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत छोटेखानी साजरा झाला.
 डॉ विजय सूर्यवंशी यांनी सोशल माध्यमातुन सभासद पाल्य व सभासदांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडवायचे असेल तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. विविध कला जोपासत असताना खेळ खेळताना गुणवत्ता कमी झाली तरी हरकत नाही परंतु आपले ध्येय सोडायचे नाही. मी स्वतः फुटबॉल आणि बास्केटबॉल खूप खेळायचो बारावीला कमी गुण मिळालेत परंतु पुढे मात्र ध्येय गाठले. पालकांनी विनाकारण आपल्या  मुलांपासून जास्त टक्केवारीची अपेक्षा ठेवू नये. मुले आपल्या क्षमतेनुसार गुणवत्ता प्राप्त करतात. पतसंस्थेमार्फत गुणगौरव केल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी कौतुक करतो असंच यश पुढेही मिळवा अशा शुभेच्छा आयुक्तांनी यावेळी दिल्या.
     पतपेढी संचालक तथा कार्यक्रम समिती प्रमुख गुलाबराव पाटील यांनी गुणवंत पाल्य व सेवानिवृत्त सभासद यांनी आपल्या पतसंस्थेच्या शाखेत जाऊन आपली भेटवस्तू  स्वीकारण्याचे आव्हान केले. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष  डॉ.प्रशांत पाटील उपस्थित होते. तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीर घागस, उपाध्यक्ष  प्राजक्ता लोटलीकर, कार्यवाह प्रा.रमेश बुटेरे, कार्यक्रम समिती प्रमुख गुलाबराव पाटील, कर्ज समिती प्रमुख प्रशांत भामरे व व्यवस्थापक चंद्रशेखर बागुल उपस्थित होते. 

 570 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.