महिला बचत गटांना रोजगाराचे माध्यम म्हणून जुन्या कापडापासून माफक दरात पिशव्या तयार करून विक्री करीत प्लास्टिक पिशव्याबंदीला केला पर्याय उपलब्ध
कल्याण : मनपाने शुन्य कचरा मोहीमेची प्रभावीपणे अमंलबजावणी सुरू केली असुन आतापर्यंत सुका कचरा मोहिमेअंतर्गत ८ टन जुने कपडे संकलित करून महिला बचत गटांना रोजगाराचे माध्यम म्हणून जुन्या कापडापासून माफक दरात पिशव्या तयार करून विक्री करीत प्लास्टिक पिशव्याबंदीला पर्याय उपलब्ध केला आहे.
महापालिका परिसर अधिकाधिक सुंदर आणि स्वच्छ रहावा याकरिता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गत २५ मे पासून महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या शून्य कचरा मोहीमेअंतर्गत दर रविवारी सुका कचरा संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कापड, गादया, जुने कपडे संकलित करण्यात येतात. गेल्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सिद्धी वेस्ट टू ग्रीन या संस्थेच्या मदतीने ४ टन कपडे महापालिकेकडे संकलीत झाले होते. आताही या मोहिमेला नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला असून रविवारी सुमारे ३ टन कपडे महापालिकेकडे संकलित झाले आहेत.
या संकलीत कपड्यांपासून महिला बचत गटाच्या माध्यमातून शिवण्यात आलेल्या कापडी पिशव्याना देखिल दुकानदार, व्यापारी व नागरिक यांच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रति पिशवी ५ रू या नाममात्र दराने कापडी पिशव्या शिवून बाजारात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महापालिकेची शून्य कचरा मोहीम यशस्वी होण्यासाठी तसेच प्लास्टिकला आळा घालून पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांच्या प्रयत्नातून साकारलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
428 total views, 1 views today