सरकारने व्हॉट्सअप, फेसबुकवर बंदी घालावी

व्हॉटसअप, फेसबुकच्या नवीन नियमांच्या विरोधात कॅटने केली मागणी
मुंबई : कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) आजपासून लागू होणाऱ्या व्हॉट्सअपच्या नव्या नियमांबाबत तीव्र आक्षेप घेतला आहे. या नियमांमुळे व्हॉट्सअप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती, संपर्क, त्याचे ठिकाण , त्याच्या व्यवहाराची देवाणघेवाण आणि अन्य महत्वाच्या व्यवहारांची माहिती या नव्या नियमांमूळे मिळणार असून त्यांना ती कशासाठीही वापरता येणार आहे. या मुद्द्यावर कॅटने केंद्रीय प्रोऔद्योगिक मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र पाठवून सरकारने व्हॉट्सअपला देशात नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यास मनाई करावी, तसेच व्हॉट्सअप आणि त्याची मुळ कंपनी असलेल्या फेसबुकवर ताबडतोब बंदी घालण्यात यावी अशी मागणी केल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेअर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
सुरेशभाई ठक्कर म्हणाले, देशातील २०कोटीहून अधिक नागरिक फेसबुकचा वापर करतात. अशा प्रत्येक नागरिकांची माहिती आपल्या नवीन नियमाचा आधार घेत जबरदस्तीने मिळवण्याच्या प्रयत्नामुळे  केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर सुरक्षेलाही धोका निर्माण होणार आहे. ईस्ट इंडिया कंपनीही देशात मिठाचा व्यापार करण्यासाठी आली पण नंतर त्यांनी देशाला गुलाम केले. वर्तमान काळात देशाची अर्थव्यवस्था आणि सामजिक संरचनेच्या दृष्टीने  माहिती महत्वपूर्ण असते. सुरुवातीला व्हॉट्स अप आणि फेसबुक मोफत वापरायला देणाऱ्या या कंपनीचा मूळ उद्देश आता उघड झाला आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीची माहिती मिळवून भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्था आणि व्यापारावर नियंत्रण मिळवण्याचा त्यांचा छुपा डाव आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया आणि सरचिटणीस प्रविण खंडेलवाल म्हणाले, व्हॉट्सअपने आता आपले नियम बदललेले आहेत. त्यामुळे त्याचा वापर करणाऱ्यांना आता त्यांच्या मनमानी आणि एकतर्फी असलेले नियमन मान्य करावे लागणार आहेत. हे नियम त्यांनी मान्य केले नाहीत तर त्यांना मोबाईलवरून व्हॉट्सअप हटवावे लागणार आहे. व्हॉट्सअपचे नवे नियम नागरिकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत. ही बाब भारतीय संविधानाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करावा.
नव्या नियमामुळे कुठल्याही युझरचे स्थान, त्याचा वापर, फोनची माहिती व्हॉट्सअपला सहज मिळवता येणार आहे. याशिवाय या नियमामुळे व्हॉट्सअपला एखाद्याच्या बँक व्यवहाराची माहितीही मिळवता येईल, त्याचा वापर करता येईल. एखादा युझरने कोणाला किती पैसे दिले, त्याने काय खरेदी केले, त्या सामानाची पोच कुठे होणार आहे यामहितीसह युझर ला लागणाऱ्या सामानाची मात्रा, हवाई, रेल्वे प्रवास अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींची माहिती मिळणार असल्याने व्हॉट्सअपवर बंदी आणण्याची मागणी कॅटने केली आहे.

 394 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.