कोविड १९ लसीकरणासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज

महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत पार पडला लसीकरणाचा ड्राय रन

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज घोडबंदर रोडवरील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र येथे कोविड १९ लसीकरणाचा यशस्वी ड्राय रन घेण्यात आला. यावेळी शहराचे प्रथम नागरिक महापौर नरेश गणपत म्हस्के, उपमहापौर पल्लवी पवन कदम, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि कर्मचारी यांनी डमी रुग्ण म्हणून सहभाग घेतला.
कोविड १९ लसीकरणाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज, ८ जानेवारीला ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर रोडवरील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर कोविड १९ लसीकरणाचा ड्राय रन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी उपमहापौर गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती सभापती साधना जोशी, नगरसेवक नरेश मणेरा, सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेविका नम्रता घरत व महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी ठाणे शहरातील कोविड महामारी आटोक्यात आणण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.‍विपीन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने उत्तम काम केल्यामुळे कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६ टक्क्यांवर आले आहे. लसीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाच्या नियमांचे पालन करुन संपूर्ण तयारी केली असून लसीकरणासाठी महापालिका सज्ज असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी कोविड लसीकरणाच्या ड्रायरनच्या वेळी स्पष्ट केले.
तसेच लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून याबाबतची माहिती को-विन(CO-WIN) या पोर्टल्वर टाकण्याचे काम सुरू असून शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाची पूर्ण तयारी महापालिकेने केली असल्याचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले. यावेळी महापौर व आयुक्त, उपमहापौर, सभागृह नेते यांनी डमी रुग्ण म्हणून महत्वाची भूमिका पार पाडून सर्वसामान्य नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत विश्वास निर्माण केला आहे.
कोरोनाच्या सुरूवातीच्या काळापासून महापालिका कार्यक्षेत्रात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने हातात हात घालून शासनाने वेळोवळी जारी केलेल्या नियमांचे पालन करुन काटेकोरपणे अंमलबजावणी केली त्यामुळेच आपण कोरोनावर यशस्वीरित्या मात करु शकलो याचा निश्चितच आनंद आहे. लसीकरणासाठी देखील योग्य पध्दतीने नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले असल्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के नमूद केले.
लसीकरण मोहिमेतंर्गत पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी कर्मचारी, पोलीस विभाग, ५० वर्षावरील नागरिक, अतिजोखीम गटातील रुग्ण यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून वेळोवळी प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार महापालिकेमार्फत अंमलबजावणी केली जाईल असे आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी नमूद केले तसेच उद्यापासून महापालिका कक्षातील १५ आरोग्य केंद्रावर ड्राय रन घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोविड १९ लसीकरणाची पूर्व तयारी म्हणून हा ड्राय रन घेण्यात आला असून या ठिकाणी लसीकरणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी प्रतिक्षा कक्ष, नोंदणी कक्ष आणि लसीकरण कक्ष निरीक्षण कक्ष आदी सुविधा निर्माण करण्यात आला आहे.
या ड्राय रनसाठी रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर काम करणाऱ्या एकूण २५ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान लसीकरण करण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची माहिती केंद्र शासनाच्या को-विन(CO-WIN) या ॲपवर अद्ययावत करण्यात आली असून यामध्ये आरोग्य कर्मचारी, डॅाक्टर्स आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 871 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.