मालमत्ता व पाणीपट्टी कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

ठाणे महापालिकेची करसंकलन केंद्र ३१जानेवारीपर्यत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत सुरू राहणार आहेत.

ठाणे : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेवून ठाणेकर जनतेला दिलासा मिळावा यासाठी जे निवासी करदाते १ ते ३१ जानेवारी या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा निवासी करदात्यांना थकीत मालमत्ता व पाणीपट्टीवर आकारलेल्या शास्तीच्या रक्कमेवर १०० टक्के सूट देण्यात येणार आहे. करदात्यांच्या सोईसाठी ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील सर्व करसंकलन केंद्र तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रामधील करसंकलन केंद्र ३१जानेवारीपर्यत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत सुरू राहणार आहेत.
करदात्यांसाठी ही योजना १ ते ३१ जानेवारी या कालावधीकरिता कार्यान्वित असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कराची थकबाकी असल्यास संपूर्ण थकबाकी, संपूर्ण चालू मागणी आणि सूट नंतरची देय शास्ती (दंड / व्याज) ची रक्कम उपरोक्त मुदतीमध्ये एकत्रित जमा करणे अनिवार्य आहे. ज्या करदात्याने मालमत्ता कराची व पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम शास्तीसह या योजनेपूर्ण जमा केली असेल त्यांना ही सूट देय असणार नाही. प्रस्तुत शास्ती (दंड, व्याज) माफीच्या योजनेतंर्गत काही विवाद, आक्षेप उत्पन्न झाल्यास त्याबाबत महापालिका आयुक्त यांचे निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. ३१ जानेवारीपर्यत कर जमा करुन योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांना महापालिकेच्या अटी मान्य आहेत, असे समजण्यात येईल, त्या संदर्भात कोणताही आक्षेप करदात्यांना घेता येणार नाही.
ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरणेकरिता देयके महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जे करदाते, नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोईचे व्हावे याकरिता ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उपप्रभाग स्तरावील कर संकलन केंद्र तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रामधील कर संकलन केंद्र ३१ जानेवारीपर्यत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सर्व शनिवार या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ या वेळेत सुरू राहतील. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या DigiThane या ॲपद्वारे मालमत्ता कराचा भरणा केल्यास या DigiThane ॲपद्वारे मिळणारी सूटही मिळू शकेल. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 289 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.