क्षयरोग शोध मोहिम व कुष्ठरोग शोध अभियानला सहकार्य करा

पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आवाहन

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या क्षयरोग शोध मोहिम व कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत आपल्या दारी येणा-या आरोग्य कर्मचारी, आशा व पुरुष स्वयंसेवक यांना माहिती देवून महापालिकेच्या या मोहिमेस सहाय्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
भारत सरकारमार्फत सन २००३ पासून सुधारीत राष्‍ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. सन २०२५ पर्यंत आपला देश क्षयमुक्त करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाने क्षयरोग विभागामार्फत, गृहभेटीतून क्षयरुग्ण शोधण्यासाठी जोखमीच्या लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही १ ते १६ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम या अंतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरोग व कुष्ठरोग शोध अभियान महापालिकेच्या १५ नागरी आरोग्य केंद्रामार्फत ४१० आरोग्य कर्मचारी /स्वयंसेवक यांचे मदतीने राबविण्यात येत आहे.
क्षयरोग आणि कुष्ठरोग हे आजार लवकर निदान होऊन पूर्ण उपचार केल्यास निश्चितच बरे होणारे आजार आहेत. यासाठी आवश्यक त्या तपासण्या व उपचार मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे क्षयरोग व कुष्ठरोग या आजारांचे लवकर निदान होण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रात ही संयुक्त मोहिम राबविली जात असून समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधुन त्यांचेवर उपचार करुन त्यांना रोगमुक्त करण्यासाठी आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचारी, आशा व पुरुष स्वयंसेवक यांना माहिती देवून महापालिकेच्या क्षयरोग शोध मोहिम व कुष्ठरोग शोध अभियान या संयुक्त मोहिमेस सहाय्य करावे, असे आवाहन‍ महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

 580 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.