रिअल इस्टेटवर ‘कोविड-१९ ‘चा परिणाम – मुंबई शहरातील मागणी-पुरवठ्याच्या ट्रेंडमध्ये होत आहे बदल

सुगी ग्रुपचे ग्रूप जनरल काउन्सेल रोहित कदम यांनी व्यक्त केले मत

मुंबई : कोविड-१९ या साथीच्या रोगाने आपल्या जगण्याची पद्धत बदलून टाकली आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, समुदाय, कंपनी, क्षेत्र, देश या सर्वांवर या साथीचा परिणाम झालेला आहे. रिअल इस्टेट क्षेत्र हे काही वेगळे नाही. हे क्षेत्र या आधीपासूनच रोख तरलता, तुटपुंजी मागणी आणि किंमतीच्या वाढीतील घसरण या आव्हानांना तोंड देत आहे. यामुळे असंघटित गुंतवणूकदार या क्षेत्रापासून दूर जात आहेत.
या अशा अवघड परिस्थितीशी खरे तर रिअल इस्टेट क्षेत्र परिचित आहे. २००७-०८ मध्ये अमेरिकेतील सब-प्राइम संकटामुळे आलेली जागतिक मंदी असो, अथवा जीएसटी, नोटबंदी या देशांतर्गत निर्णयांमुळे भोगावे लागलेले परिणाम असो, रिअल इस्टेट हे क्षेत्र नेहमीच दोन महत्त्वाच्या घटकांच्या जोरावर टिकून राहिले आहे :
१. घरे किंवा इतर कोणत्याही स्वरुपातील मालमत्ता ही मूलभूत गरज आहे, हे तत्व;
२. बदलत्या परिस्थितीत अनुकूल ठरतील, असे उपाय योजण्याची या उद्योगातील कंपन्यांची परिवर्तनीयता. या क्षेत्रातील काही उद्योजक इतरांपेक्षा चांगले आहेत आणि काही अधिक नाविन्यपूर्ण आहेत, मात्र अखेरीस प्रत्येकजण परिस्थितीशी जुळवून घेतो.
बाजारपेठांमध्ये संघर्ष सुरू आहे आणि घर खरेदीदारांना योग्य किंमत देण्याचा विकासक विचारही करीत आहेत, परंतु अशाही काही वेळा असतात, जेव्हा किंमती उतरविणे बाजारात शक्य होत नाही. घर खरेदीसाठी सध्याचा काळच योग्य आहे, हे कोरोना साथीच्या काळात निश्चित झाले आहे. अॅनारॉकच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, ५४ टक्क्यांपेक्षा जास्त लोक घर विकत घेण्यासाठी ‘आता’चा काळ आदर्श मानत आहेत. याचे कारण असे की अधिक नफा कमावण्याचा विचार करण्यापेक्षा, पैसे मोकळे होण्याला विकासकांकडून प्राधान्य दिले जात आहे. तसेच, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मागणी निरंतर राहावी, याकरीता सरकार, आरबीआय आणि बँका अतिशय कमी दरांत गृह कर्ज, मालमत्ता तारण कर्ज आणि इतर कर्जे सहजपणे उपलब्ध करून देत आहेत.
पुरवठ्याच्या बाजूने विचार केल्यास, पुढील काही घटकांमुळे आता घरखरेदी करण्यात अधिक गती येण्याची शक्यता आहे
शिल्लक साठ्यामधील घट : देशव्यापी टाळेबंदीमुळे अनेक प्रकल्पांचे बांधकाम, त्यांचे सादरीकरण व विक्री हे सर्व ठप्प झाले. त्यामुळे नवीन प्रकल्प हाती घेण्याऐवजी, अस्तित्वात असलेली, शिल्लक राहिलेली घरे विकण्याकडे विकासकांचा यापुढे कल राहील. नवीन घरांच्या पुरवठ्यावर याचा मोठाच परिणाम होईल. शिलकीतील घरांची संख्या कमी होऊ लागेल, तशा घरांच्या किंमती वाढू लागतील. त्यामुळे आता लगेच घर घेणाऱ्यांना कमी किंमतीचे लाभ मिळू शकतील. अर्थात, लवकर निर्णय घेणाऱ्याला जास्त फायदा, हे सूत्र अल्प काळासाठीच राहील, तसेच वैयक्तिक गुंतवणूकदारांना घरखरेदी करण्यास आकर्षित करेल.
विकासकांच्या खर्चामध्ये वाढ : विकासकांचे खर्च सध्या तरी कमी होणारे नाहीत, त्यामुळे घरांच्या किंमती अचानक कमी होणार नाहीत. याचे कारण, रिअल इस्टेट क्षेत्रासाठी सरकारने विशेष आर्थिक योजना आखलेल्या नाहीत, तसेच नगरविकास अधिकाऱ्यांकडून शुल्क आकारणी मात्र मोठ्या दराने होत आहे. याशिवाय, प्रचलित टाळेबंदीमुळे बांधकाम खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. बांधकाम कामगारांना त्यांच्या कामकाजाच्या वातावरणात सुसज्ज असणे आवश्यक असणार आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास विकासकांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागणार आहे.
मागणीच्या बाजूने विचार केल्यास, पुढील काही घटकांमुळे घरखरेदी करण्यात अधिक गती येण्याची शक्यता आहे :
घरांचा मालकीहक्क : कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून, सुरक्षितता, शारिरीक अंतर, खासगीपणा आणि व्यक्तिगत जागा असणे याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय नागरिक या गोष्टींना प्राधान्य देऊ लागले आहेत. स्वतःच्या मालकीचे घर असण्याने सुरक्षितता व स्थैर्य या भावना जपल्या जातात. सद्यपरिस्थिती लक्षात घेता, टाळेबंदीनंतरदेखील अनेक नागरिक घरातूनच काम करीत राहतील, तसेच कामाच्या ठिकाणी जाण्याच्या प्रवासाची वेळ आणि कुटुंबातील बहुतेक सदस्यांसाठी स्वतंत्र खोली असण्याची गरज या गोष्टींचा विचार करतील. घर खरेदीचा निर्णय घेताना ते या गोष्टींना प्राधान्य देतील.
सरतेशेवटी, स्वतःचे घर असण्याची गरज, या घरांसाठीच्या योग्य किंमती आणि कमी व्याजदराच्या कर्जाची उपलब्धता या घटकांमुळे मागणी व पुरवठा यांच्यातील तफावत कमी होण्याकडे परिस्थिती बोट दाखवत आहे, असे म्हणता येईल. अशा वेळी रिअल इस्टेट उद्योग स्वतःचा फायदा करून घेईलच; घर खरेदीदारांना, गुंतवणूकदारांनादेखील योग्य निर्णय घेण्यासाठी आताची परिस्थिती आदर्श आहे.

 409 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.