जीवन सहज, सुंदर आणि स्थिर बनविण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा

७३व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सांगता समारंभात निरंकारी माता सुदीक्षाजी महाराज यांचे प्रतिपादन

 
कल्याण : ‘‘जीवन सहज, सुंदर आणि स्थिर बनविण्यासाठी दिव्य गुणांचा स्रोत असलेल्या परमात्म्याशी नाते जोडा.’’ असे विचार माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानवतेला प्रेरित करताना तीन दिवसीय ७३व्या व्हर्च्युअल वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन दिवशी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले. या संत समागमाचा संत निरंकारी मिशनची वेबसाईट व संस्कार टी.व्ही.चॅनलच्या माध्यमातून जगभर पसरलेल्या लाखो भाविक भक्तगणांनी आनंद घेतला.
       माता सुदीक्षाजी महाराज यांनी व्हर्च्युअल रुपात आयोजित केलेल्या ७३व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सांगता समारोहामध्ये मानवमात्राला आवाहन करताना उपरोक्त उद्गार काढले. संत निरंकारी मिशनची वेबसाईट आणि संस्कार टी.व्ही.चॅनलवर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आदि क्षेत्रांसह संपूर्ण देश आणि जगभरातील लाखो भाविक भक्तगणांनी आणि जनसामान्यांनी या संत समागमाचा आनंद प्राप्त केला. 
 या अगोदर समागमाच्या पहिल्या दिवशी, ५ डिसेंबर रोजी  माताजींनी ‘मानवतेच्या नावे संदेश’ प्रेषित करुन समागमाचे विधिवत उद्घाटन केले ज्यामध्ये भौतिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले गेले.  समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ एका रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला ज्यामध्ये देश-विदेशातील सेवादल बंधु-भगिनींनी सेवादल प्रार्थना, कवायत, खेळ तसेच विविध भाषांमध्ये लघुनाटिकांच्या माध्यमातून मिशनचा संदेश प्रस्तुत केला. 
      समागमाच्या समापन सत्रामध्ये सायंकाळी एक बहुभाषी कवि संमेलन आयोजित करण्यात आले ज्यामध्ये देश-विदेशातील २१ कविंनी ‘स्थिर प्रभुशी मनाला जोडू या, जीवन आपुले सहज करू या’ या शीर्षकावर आधारित विविध भाषांतून आपापल्या कविता सादर केल्या. या कवी सज्जनांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून मानवी जीवनात स्थिरतेचे महत्व समजावून स्थिरतेच्या प्रत्येक पैलुवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.
      समागमाच्या तिन्ही दिवशी भारतासह जगभरातील ब्रह्मज्ञानी संत वक्त्यांनी विविध भाषांच्या माध्यमातून समागमामध्ये आपले उद्बोधक विचार मांडले. तसेच संपूर्ण अवतार बाणी तथा संपूर्ण हरदेव बाणी या काव्यमय रचनांमधील पदांचे सुमधूर गायन, पुरातन संतांची भजने, अभंगवाणी आणि मिशनच्या गीतकारांच्या प्रेरणादायी रचनांचे गायन करुन समागमाचा आनंद घेणाऱ्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
      आपापल्या घरांमध्ये बसूनच व्हर्च्युअल रुपात लक्षावधी भक्तगणांनी आणि जनसामान्यांनी या संत समागमाचा आनंद प्राप्त केला आणि पुढील समागम प्रत्यक्ष रुपात मैदानावर आयोजित व्हावा अशी मनोमन प्रार्थनाही केली.

 819 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.