जमाबंदी प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे होणार गावठाणांचे भूमापन

महाराष्ट्र राज्यातील जमाबंदी प्रकल्प राबविण्यासाठी प्रत्येक गावांना असलेल्या गावठाण जागेचे भूमापन आता ड्रोनद्वारे होणार आहे
मुरबाड (शामकांत पतंगराव) : राज्यातील जमाबंदी प्रकल्प राबविणेबाबत गावांच्या गावठाणांचे भूमापन ड्रोनव्दारे करण्यासाठी शासन स्तरावरून मान्यता देण्यात आली असून कोकण विभागातून ठाणे जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड तालुक्याची निवड प्रथम टप्प्यात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील जमाबंदी प्रकल्प राबविण्यासाठी प्रत्येक गावांना असलेल्या गावठाण जागेचे भूमापन आता ड्रोनद्वारे होणार असून यासाठी भूमी अभिलेख (महसूल)विभाग,ग्राम विकास विभाग व सर्व्हे आॕफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने स्वामित्व योजने अंतर्गत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या साठी
कोकण विभागातून ठाणे जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड तालुक्याची निवड प्रथम टप्प्यात करण्यात आली आहे.
भूमापन अभियानबाबतचे पूर्वनियोजनास्तव मुरबाडच्या भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक यांच्यावतीने ग्रामसेवक व तलाठी यांच्यासाठी मुरबाड पंचायत समिती आवारातील शांतारामभाऊ घोलप सभागृहात ड्रोनव्दारे गावठांण भूमापन प्रशिक्षण कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी आयोजीत केला होता.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीलेल्या मुरबाड विधानसभा मतदार संघांचे आमदार किसन कथोरे यांनी ड्रोन सर्व्हेचे महत्त्व विषद करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून योजना यशस्वीरीत्या राबविण्याबाबत आवाहन केले.
यावेळी मुरबाड पंचायत समिती सभापती,उपसभापती व सर्व सदस्य उपस्थित होते.भूमिअभिलेख उपअधीक्षक महेश राजगुरू यांनी देखील ड्रोन सर्व्हे बाबत उपस्थित ग्रामसेवक,तलाठी यांना योजनेची कार्यपद्धती तसेच फायदे ,महत्त्व याबाबत प्रशिक्षण दिले.
ज्या प्रमाणे ७/१२ उतारा हा शेत जमिनीचा पुरावा असतो तसेच नगर भूमापनाकडील आखिव पत्रिका, सनद,नकाशा यावर धारकांची नांवे क्षेत्र,सत्ताप्रकार,जागेची,घरांची आकृती,चतुःसिमा इत्यादी महत्त्वाचे बाबींचा समावेश असून हे अभिलेख म्हणजे कायदेशीर मालकी-हक्काचे ठोस पुरावे असून यातून शासनाचे महसूलातही वाढ होणार असून या अभियान भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक अनिल माने यांचे मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध सुरू असल्याचे यावेळी सांगितले.
या प्रशिक्षणासाठी मुरबाड तालुक्यातील ग्रामसेवक व तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमती संघरत्ना खिल्लारे, विस्तार अधिकारी व पंचायत समितीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते सदर प्रशिक्षणाचे पुर्व नियोजन कामी भूमी अभिलेख मुरबाड कार्यालयाचे सुर्वे, वंदना ढोबळे,रविंन्द्र उबाळे,अभिजित धलपे़,नितीन डोंबाळे,राजेश जाधव,ईस्माईल मुकादम,हिरामण सपकाळ सराई,गायकर आदींनी परिश्रम घेतले.

 608 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.