राजधानी दिल्लीसह देशातील रिटेल व्यापार,बाजार, वाहतूक सुरु राहणार

कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स आणि ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशन मंगळवारच्या बंदमध्ये सहभागी होणार नाहीत

मुंबई : राजधानी दिल्लीच्या वेशीवर आलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मंगळवार, ८ डिसेंबररोजी बंदची हाक दिली आहे. देशातील विविध विरोधी पक्षांनी या बंदला समर्थन दिले आहे. रिटेल व्यापाऱ्यांची कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट) आणि वाहतुकदारांची ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशन (ऐटवा) या दोन शिखर संघटना या बंद मध्ये सहभागी होणार नाहीत. त्यामुळे मंगळवारी देशातील सर्व रिटेल दुकाने, बाजार आणि वाहतूक सुरू राहणार असल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
कॅट आणि ऐटवाचे चेयरमन प्रदीप सिंघल, अध्यक्ष महेंद्र आर्य यांनी संयुक्तपणें प्रसिद्धी पत्रक काढले आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही शेतकरी संघटना किंवा आंदोलक शेतकऱ्यांच्या नेत्यांनी कॅट किंवा ऐटवाशी भारत बंदच्या संदर्भात संपर्क साधला नाही तसेच पाठींबाही मागीतलेला नाही. त्यामुळे देशातील रिटेल व्यापारी आणि वाहतूकदार मंगळवारच्या भारत बंद मध्ये सहभागी होणार नसल्याचे सुरेशभाई ठक्कर म्हणाले.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया, सरचिटणीस प्रविण खंडेलवाल, ऐटवाचे प्रदीप सिंघल आणि महेंद्र आर्य म्हणाले आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात वरीष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहेत. त्यामुळं या बंदमध्ये स्वारस्य नाही. देशातील व्यापारी आणि वाहतुकदारांना शेतकऱ्यांबद्दल सहानभूती आहे. कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकार मध्ये सुरु असलेल्या चर्चेतून चांगले निष्पन्न होईल असा आम्हाला विश्वास आहे.
देशातील शेतकरी आता नुकसानीत शेती करत आहेत. फायद्यातील शेतीसाठी शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याची वेळ आता आली आहे आणि ठराविक मर्यादीत काळात त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे.आपल्या पिकाला चांगला फायदा मिळेल असा शेतकऱ्यांना विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. स्वतंत्रपणे चांगले पीक घेण्यासाठी व्यापारी शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करतील. व्यापाऱ्यांकडून काही उणिवा राहत असतील त्या तातडीने दूर केल्या जातील.शेतकऱ्यांना चांगली वाहतूक व्यवस्था देण्यासाठी वाहतुकदारही कुठलीच कसर बाकी सोडणार नाहीत असे सुरेशभाई ठक्कर स्पष्ट केले.

 406 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.