ग्रामपातळीवर पायाभूत कार्य करण्यासाठी आयोजित केला उपक्रम
ठाणे : सामाजिक कार्याची गंगोत्री तळगाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी व ग्राम पातळीवर पायाभूत सामाजिक कार्य व्हावे या हेतून लायन्स क्लब भिवंडी तर्फे शनिवार लाखिवली येथे “वनराई बंधारा बांधण्यात आला.
पाणी-अडवा! पाणी जिरवा!!
श्रमदान करू, जल संधारणाची कास धरू!! या महामंत्राचा घोष करून नदी-नाले-ओढे यांचं वहातं पाणी अडवून जल-संधारण व्हावं हा मुळ हेतू लक्षात घेऊन मुख्यतः
सामाजिक सहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे ग्रामीण भागात बांधले जातात. असा बंधारा बांधणे हा जरी सोपा उपक्रम असला तरी हा पर्यावरण-स्नेही प्रकल्प जल-संधारण,पाणी अडवा! पाणी जिरवा!! या संकल्पनेवर आधारीत जैव विविधतेला चालना देणारा व ग्रामीण भागाला वरदानदायक वनराई बंधारा बहू उपयोगी आहे.
वृक्ष-वल्ली,जलचर,गुरेढोरे,
पशू-पक्षी,शेतकरी,ग्रामस्थ,
पांथस्थ-वाटसरू आदी सर्वांनाच असा बंधारा एक वरदान आहे. स्वयंसेवक म्हणून श्रमदानासाठी या उपक्रमात लायन्स क्लब सोबत सह्याद्री पतसंस्था,लिओ क्लब,दादासाहेब दांडेकर विद्यालय या सर्व संस्थांचे मिळून१२५ स्वयंसेवक सहभागी झाले होते. दांडेकर शाळेचे मुख्याध्यापक श्री.वाघसर स्वतः उपस्थित राहून सर्व विद्यार्थी व शिक्षकांसह श्रमदानात सहभागी झाले होते. सह्याद्री पतसंस्थेचे महा-व्यवस्थापक सुभाष पाटील, सर्व व्यवस्थापक,कर्मचारी, दै.ठेव प्रतिनिधी या सर्वांसोबत श्रमदानातही अग्रेसर होते. लायन्स-लिओ क्लबचे सर्व पदाधिकारी-सदस्य सहकुटुंब मोठ्या उत्साहाने या
श्रम-साहस प्रकल्पात सहभागी झाले होते. विशेषतः लिओ प्रेसिडेंट अनुराग गुप्ता याच्या लिओ टीमचा सहभाग उत्साहवर्धक होता. कोरोना महामारी चे संकट लक्षात घेऊन खबरदारीच्या सर्व उपाय योजनांसह लायन डॉ.माणिक दळवी व डॉ. प्रफुल्ल दळवी यांनी प्रथमोपचार सेवा सज्ज ठेवली होती. या सामाजिक उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी झालेल्या स्वयंसेवकाच्या श्रमदानातून
लाखिवली नदीवर सुमारे १०० फुट लांबीचा भव्य बंधारा बांधून या सर्व संस्थांनी सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तूपाठ समाजापुढे प्रत्यक्ष कृतितून सादर केला आहे.
वनराई बंधा-याच्या उद्घाटन प्रसंगी लायन्स क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कमल किशोरजी हेडा सपत्निक उपस्थित होते .इतर अनेक मान्यवरांनी प्रकल्पास भेट देऊन आयोजक व स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला व आयोजकांना हा उपक्रम अखंडपणे पुढेही चालू ठेवावा असे आवाहन केले .या उपक्रमास भिवंडी तालुक्यातील व परिसरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांना धन्यवाद देऊन सर्व सहभागी संस्था व स्वयंसेवकांचे कौतुक केले.
शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख तथा सह्याद्री पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास थळे, संचालक हनुमान माळी, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी प्रकल्पास भेट देऊन सर्वांना सदिच्छा दिल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबच्या अध्यक्षा शितल देशमुख , सुधीर देशमुख,पर्यावरण समिती सभापती प्रमोद पाटील यांनी नियोजनबद्ध अथक परिश्रम करून हा प्रकल्प यशस्वीपणे राबविला.सदर प्रकल्पाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समिती भिवंडीचे इंद्रजित काळे ,ग्राम पंचायत लाखिवली,ग्रामस्थ शबाळकृष्ण पाटील, महादेव पाटील व इतर अनेकांचे मौलिक मार्गदर्शन हातभार व पाठबळ लाभले.
482 total views, 1 views today