केडीएमसी, आरोग्य विभागाचा संयुक्त उपक्रम
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सकिय क्षयरुग्ण, कुष्ठरुग्ण शोध अभियान १ ते १६ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सदर अभियान १५ नागरी आरोग्य केंद्रामार्फत अतिजोखमीच्या ३,५८,७५० लोकसंखेचे एकत्रित सर्वेक्षण २०५ टीम ( प्रत्येक टिममध्ये १ पुरुष व १ स्त्री) द्वारे करण्यात येणार असून यासाठी ४१० आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक काम करणार आहेत.
कोव्हीड-१९ परिस्थितीमुळे कमीत कमी कालावधीमध्ये कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचा शोध घेवून निदान निश्चितीनंतर औषधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. सन २०२०-२१ मध्ये राज्याचे क्षयरोग नोटीफिकेशनचे काम ४० टक्के पर्यंत कमी झाले असून विशेष क्षयरोग शोध मोहीमेद्वारे जास्तीत जास्त नवीन रुग्ण शोधून उपचाराखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे.
भारत सरकारतर्फे सन २००३ पासून राज्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. सन २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी समाजातील प्रत्येक क्षयरुग्ण ओळखून त्यांचा उपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने क्षयरोग विभागामार्फत गृहभेटीतून क्षयरुग्ण शोधण्यासाठी जोखमीच्या लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
दोन आठवडयांपेक्षा जास्त काळ खोकला, मुदतीचा ताप, वजनात घट होणे, थुकीदवारे रक्त पडणे किंवा मानेवर गाठी असल्यास क्षयरोगाच्या अधिक तपासण्या करुन निदान निश्चित करण्यात येईल व औषधोपचार चालू केले जातील. आवश्यक त्या सर्व तपासण्या व औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. त्याशिवाय कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी स्वयंसेवकांमार्फत करण्यात येईल. न खाजणारा चमकदार बट्टा, फुगीर नसा, किंवा संवेदनाहीन हात,पाय आणि विकृती आढळल्यास वैद्यकीय अधिका-यामार्फत तपासणी करुन निदान निश्चित करण्यात येईल. कुष्ठरोगाचे औषधोपचार मोफत उपलब्ध आहे.
या मोहिमेदवारे समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधणे तसेच या आजारांबद्दल जनजागृती करणे अशी दुहेरी उददीष्टे साध्य होणार आहेत. तरी सर्व नागरीकांनी आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचारी, आशा व पुरुष स्वयंसेवक यांना नि:संकोचपणे माहिती देऊन सदर सकिय क्षयरुग्ण शोध मोहिम कुष्ठरुग्ण शोध अभियान या संयुक्त मोहिमेस सहाय्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
488 total views, 2 views today