सीसीटिव्ही कॅमेर्‍याला बघून घाबरु नका

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावले बंद कॅमेर्‍यांवर फलक, शानू पठाण यांनी दिला आठ दिवसांचा अल्टीमेटम
ठाणे : “सीसीटिव्ही कॅमेर्‍याला बघून घाबरु नका; कॅमेरा बंद आहे”असे फलक लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे युवाध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी या बंद सीसीटीव्ही कॅमेर्‍यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन केले.
ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने गाजावाजा करत महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. ठाणे पालिका हद्दीमध्येे प्रभाग सुधारणा निधीतून १२००, वायफाय योजनेतून १०० असे एकूण १३०० कॅमेरे बसविले आहेत. तसेच यापूर्वी महापालिका आणि अन्य निधीतून १०० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय, तीनशे ते चारशे कॅमेरे आणखी बसविण्यात येणार होते. या कॅमेर्‍यांमुळे सोनसाखळी चोरी आणि रस्त्यावरील गुन्हेगारीला आळा बसेल, या उद्देशातून महापालिकेने ही योजना राबविली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत लावण्यात आलेल्या कॅमेर्‍यांपैकी ठाणे शहरातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुंब्रा-कौसा आणि दिव्यातील १०० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या संदर्भात ठामपाच्या विद्युत विभागाशी संपर्क साधूनही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी सोमवारी सीसीटीव्ही लावलेल्या खांबांवर चढून “सीसीटिव्ही कॅमेर्‍याला बघून घाबरु नका; कॅमेरा बंद आहे; ठामपा सुस्त.. ठेकेदार मस्त” असे फलक लावले.
या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पठाण यांनी सांगितले की, ठाणे महानगर पालिकेने मोठा गाजावाजा करुन हे सीसीटीव्ही बसविले होते. त्यासाठी नगरसेवक निधीतील ५ लाखांच्या रक्कमेचा वापर करुन सीसीटीव्हीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. हा खर्च आता पाण्यात गेलेला आहे. एकीकडे गुन्हे वाढू नये, अशी अपेक्षा करीत असतानाच गुन्हेगारांना मोकळे सोडण्याचे हे धोरण आहे. राबोडीमधील हत्याकांडाची उकल करण्यासाठी याच सीसीटीव्हीचा वापर झाला आहे. तेथे कॅमेरे सुरु असल्याने आरोपींना पकडणे सोपे झाले होते. मुंब्रा-कौसा भागात सर्व कॅमेरे बंद असल्याने एखादा गुन्हा घडल्यास त्याचा छडा कसा लावणार? त्यामुळे येत्या आठ दिवसात जर ठामपाच्या विद्युत विभागाने सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरु केले नाहीत. तर बंदावस्थेतील हे कॅमेरे काढून ते विद्युत विभागात फेकण्यात येतील, असा इशाराही यावेळी शानू पठाण यांनी दिला.

 267 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.