अँमेझॉन, फ्लिपकार्टची बँकांशी नियमबाह्य हातमिळवणी

कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सचा भारतीय बँकांवर गंभीर आरोप

मुंबई : कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स ने (कॅट) देशातील विविध बँकांवर ई कॉमर्स कपन्यांशी नियमबाह्य हातमिळवणी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या बँकांनी अँमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कपन्यांशी साटेलोटे करून व्यापारी आणि ग्राहकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन देशातील एफडीआयची नीती सर्रास पायदळी तुडवली आहे. याशिवाय देशातील ई कॉमर्स व्यापारात अनुचित पायंडा पाडत बँका आणि अँमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्यात एक कार्टेल तयार झाला असल्याचा आरोप कॅटने केला आहे .
कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर म्हणाले, चुकीच्या पद्धतीने पायंडा पाडून असविधानिक स्पर्धेला प्रोत्साहन देणाऱ्या बँका आणि फ्लिपकार्ट, अँमेझॉन यांच्यातील संबंधांची चौकशी करून कारवाई करण्याची तक्रार शासनाकडे करणार आहोत. अशातऱ्हेचे सबंध देशातील छोट्या व्यापाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरणार आहेत. कॅटने यासंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शशिकांत दास यांना एक निवेदन दिले आहे. अनेक बँका अँमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स कंपन्यांच्या पोर्टलवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वेळोवेळी १० टक्के सूट किंवा रोख परतावा देत आहेत. त्यात प्रामुख्याने एचडीएफसी बँक, भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, सिटी बँक, कोटक महिंद्र बँक, एचएसबीसी, बँक ऑफ बडोदा, आरबीएल बँक आणि ऍक्सिस बँकेचा समावेश असल्याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.
कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल म्हणाले, बँका डेबिट किंवा क्रेडीट कार्डच्या माध्यमातून या पोर्टलवरून खरेदी करण्यावर ग्राहकांना सवलती जाहीर करतात. पण तेच सामान ग्राहकाने एखाद्या व्यापाऱ्याकडून डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यावर बँका त्यांना कुठल्याही प्रकारची सवलत देत नाहीत.
रिझर्व्ह बँकेने या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन बँकांना कॅशबॅक सवलत बंद करण्याचे आदेश द्यावेत. बँकिंगचे मानदंड आणि बँकांची संशयास्पद भूमिका लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या बँकिंग अधिनियमानुसार त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुरेशभाई ठक्कर यांनी केली आहे.

 370 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.