शहापूर तालुक्यात २३ गावामधून २११ वीज चोरांवर कारवाई
८५ लाख रुपये किमतीच्या साडेसहा लाख युनिटची वीजचोरी
शहापूर(शामकांत पतंगराव) : शहापूर महावितरण कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी आज(दि.२१)पहाटे पाच वाजता मुगाव येथे धाड टाकली असता साडेसहा लाख रुपयांची चोरी उघडकीस आली.या ठिकाणी पंधरा विजचोरांवर कारवाई करण्यात आली.
शहापूर महावितरण कार्यालयाने सुमारे महिनाभरापासून वीज चोरांवर कारवाई सुरू केली असून आज(दि.२१) पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत शेणवा कार्यालयांतर्गत असलेल्या मुगाव या ठिकाणी पंधरा ग्राहकांवर विजचोरीची कारवाई करण्यात आली.यात ३२ हजार युनिटची चोरी उघड झाली असून अंदाजे साडेसहा लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी दिली.
हि कारवाई उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली विश्वजीत खैतापुरकर, चेतन वाघ ,अविनाश क्षिरसागर व सहकर्मचारी यांनी संयुक्तरीत्या केली.
या कारवाई नंतर शहापूर वीज कार्यालयाने विज ग्राहकांना सूचित केले आहे की,विज मिटर पर्यंत येणाऱ्या वायरला जॉइंट असणे, मिटरचे सील तोडणे व अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे विज चोरीच्या हेतूने केलेले प्रयत्न हे विज चोरीच आहे असे गृहीत धरून त्यांवर महावितरण कडून कार्यवाही करण्यात येईल.
आता पर्यंत शहापूर महा वितरण कार्यालयाने २३ गावांमध्ये धाडी टाकून ८५ लाख रुपये रक्कमेचे मूल्य असलेली साडेसहा लाख युनिटची चोरी पकडली आहे.आकारलेल्या दंडापैकी ४२ लाख रुपये वसुली झाली असून १५१ वीज चॊरांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
1,369 total views, 1 views today