पत्रीपुलाच्या गर्डर लॉंचिंगला सुरवात


४० मीटर गर्डर पुढे ढकलण्यात यश
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी केली पाहणी

कल्याण :  कल्याण डोंबिवलीकरांसाठी  प्रतीक्षेत असणाऱ्या बहुचर्चित पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून गर्डर लाँचिंगचे पहिल्या टप्प्यातील काम शनिवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. विंच केबल पुश श्रू पद्धतीने  ७६ मीटर पैकी आज ४० मीटरपर्यंत हा महाकाय अवाढव्य गर्डर पुढे ढकलण्यात आला. गेल्या २ वर्षांपासून या पुलाचे काम सुरू असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामूळे ते काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या कामाची पाहणी आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
एमएसआरडीसीच्या माध्यमातून सुमारे ३६ कोटी निधीतून सुमारे १०९मीटर लांब, १२मीटर रूंद, ११ मीटर उंची ओपन वेब स्टील गर्डर प्रकाराचा पुल सुमारे ७०० टन स्टील वजन असलेला ७६मीटर लांब गर्डर आणि ३३मीटर लांब  स्टील गर्डर टाकण्याचे काम दोन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. पत्रिपुलाच्या या गर्डर लाँचिंगच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडुन तब्बल चार तासाचा मेगा ब्लाँक् घेत शनिवारी गर्डर लाँचिंगच्या पहिल्या टप्प्याच्या कामात गर्डर ४० मीटर पुढे ढकलण्यात यश आले.
या पुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी १४ तासांचे ४ मेगाब्लॉक घेण्यात आले असून त्यापैकी पहिला ४ तासांचा मेगाब्लॉक आज संपन्न झाला. अत्याधुनिक अशा विंच केबल पुश श्रू पध्दतीने आज नियोजित ५२ मीटर गर्डर सरकविण्याचे प्रयोजन होते.  त्या मध्ये ४० मीटर अंतरापर्यंत हा गर्डर हलवण्यात यश आले. यासाठी रेल्वेनेही सर्व मार्गावरील लोकल आणि मेल एक्स्प्रेसची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यापैकी उद्या म्हणजे रविवारी ४तासांचा  दुसरा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्याच्या मेगाब्लॉकदरम्यान उर्वरित ३६ मीटर अंतरावर हा महाकाय अवाढव्य गर्डर ढकलण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी दिली. 

 284 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.