ठाणे महापालिका झाली उदार, मेट्रोच्या कंत्राटदाराला मोफत भूखंड!

भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांचा आक्षेप, महासभेपुढे प्रस्ताव

ठाणे : `कोरोना’च्या काळात महापालिकेला आर्थिक फटका बसला असतानाही, ठाणे महापालिकेचे अधिकारी उदार झाले आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या कंत्राटदाराला वापरासाठी तात्पुरत्या स्वरुपात मोफत भूखंड देण्यासाठी मान्यता देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या भूखंडाचा ताबा कंत्राटदाराकडे असल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी करून प्रस्तावाला आक्षेप घेतला आहे. तसेच या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मेट्रो – ४ वडाळा-कासारवडवली प्रकल्पाासाठी बांधकामाच्या कालावधीत शासकीय -निमशासकीय संस्थांच्या मोकळ्या जागा `एमएमआरडीए’कडे हस्तांतरित करण्याचे आदेश आहेत. त्यात मेट्रो प्रकल्पाच्या कंत्राटदाराला खाजगी वा तात्पुरत्या वापरासाठी शासकीय -निमशासकीय जागा देण्याचा उल्लेख नाही. मात्र, `एमएमआरडीए’ने ६ सप्टेंबर २०१८ रोजी कास्टिंग यार्ड, लेबर कॅम्प आणि आरएमसी प्लॅंटसाठी बोरिवडे येथील सर्वे क्र. २१ येथील आरक्षण क्रमांक ३ मधील ७ हेक्टर खेळाच्या मैदानाची मागणी केली होती. प्रत्यक्षात तत्कालीन महापालिका आयुक्तांनी सेक्टर ५ येथील पार्क आरक्षण क्र. ८ येथील एकूण ७५ हजार ३९० चौरस मीटर क्षेत्राची आरक्षित जागा परस्पर स्वत:च्या अधिकारात १० ऑक्टोबर २०१८ रोजी दिली होती. त्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यताही न घेता २ नोव्हेंबर २०१८ रोजी सदर भूखंडाचा तात्पुरता ताबा ठेकेदाराला देण्यात आला, असा आरोप भाजपाच्या नगरसेविका अर्चना किरण मणेरा यांनी केला आहे. रेडीरेकनरच्या दरानुसार ५० रुपये चौरस फूट भाडे गृहित धरल्यास, दरमहा ४ कोटी रुपये भाडे महापालिकेला मिळू शकेल. त्यातून गेल्या दोन वर्षात महापालिकेचे ९६ कोटी रुपये नुकसान झाले, असे अर्चना मणेरा यांनी म्हटले आहे.
एमएमआरडीएला जागा देताना प्रस्तूत जागा विनामूल्य वा भाडेतत्वावर देण्याबाबत महासभा व शासनाचे निर्देश बंधनकारक राहतील, असे म्हटले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने ठेकेदाराला विनामूल्य जागा दिली. त्यातून महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप नगरसेविका मणेरा यांनी केला आहे.
या प्रकरणी चौकशी करून महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका मणेरा यांनी केली आहे.

तब्बल २ वर्षानंतर महासभेपुढे मान्यतेचा प्रस्ताव
कंत्राटदाराला जागा सोपविण्यात आल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर आता सेक्टर ५ मधील पार्क आरक्षण क्र. ८ येथील ७५ हजार ३९० चौरस मीटर जागा `एमएमआरडीए’कडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या महासभेपुढे मांडण्यात आला आहे. यापूर्वीही असाच ठराव मांडण्यात आला होता, याकडे मणेरा यांनी लक्ष वेधले आहे.

 394 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.