साहित्य क्षेत्रात सुखाचे दिवस आले आहेत – ज्येष्ठ कवी माधव पवार

११ सत्रातील या काव्यमहोत्सवात २२० हून अधिक कवींनी काव्य सादरीकरणाचा आनंद लुटला.

कल्याण : काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यमहोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ कवी माधव पवार म्हणाले, “काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या केवळ चार वर्षाच्या साहित्य क्षेत्रातील कार्य पाहता मराठी साहित्य क्षेत्राला सुखाचे दिवस आले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केवळ चार वर्षांत राज्यस्तरीय ९व्या काव्यमहोत्सव, पन्नासहून अधिक कवी संमेलने, अनेक कार्यशाळा, विविध उपक्रम पाहता या मंचने अल्पावधीतच खूप मोठी मजल मारली आहे.”
काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या नवव्या राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यमहोत्सवाचे ८ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९ वाजता सोलापूरचे दिवंगत कवी रा.ना. पवार यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ज्येष्ठ कवी माधव पवार यांनी उद्घाटन केले. सदर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार येथील प्रा.अशोक शिंदे हे होते. तर सोलापूरचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ए.डी. जोशी, विजयकुमार देशपांडे, ठाण्याचे कवी बाळासाहेब तोरस्कर, अमरावतीच्या साहित्यिका सीमा भांदर्गे, चारुदत्त मेहेरे आणि डोंबिवलीचे कवी गझलकार विजय जोशी इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, उपाध्यक्ष पी. नंदकिशोर, राज भिंगारे, राज्यसचिव कालिदास चवडेकर, सहसचिव आशा पाटील, दीपक सपकाळ, कोष्याध्यक्ष कृष्णा शिंदे तसेच जया नेरे, प्रमोद बाविस्कर, राष्ट्रपाल सावंत, भाऊसाहेब सोनवणे, संदीप वाघोले, रामदास देशमुख, शाम स्वामी, प्रा. सत्येंद्र राऊत इत्यादी राज्य समिती सदस्यांसोबतच काव्यप्रेमीचे सर्व विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्हा अध्यक्ष सदर काव्यमहोत्सवात उपस्थित होते.
उद्घाटन समारंभानंतर ज्येष्ठ कवी विजयकुमार देशपांडे यांच्या शुभहस्ते काव्यप्रेमी तिसऱ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. सोबतच दीपक सपकाळ संपादीत हिंदी प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशन घाटंजी महाविद्यालयाचे संचालक गिलानी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. काव्यप्रेमीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड व स्वागत झाले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन जया नेरे यांनी तर प्रास्ताविक कालिदास चवडेकर व आभारप्रदर्शन प्रमोद बाविस्कर यांनी केले.
उद्घाटन समारंभानंतर लगेचच काव्यमहोत्सवाला सुरूवात झाली. एकूण ११ सत्रातील या काव्यमहोत्सवात २२० हून अधिक कवींनी काव्य सादरीकरणाचा आनंद लुटला. सदर काव्यमहोत्सव यशस्वी करण्यासाठी मुख्य संयोजक प्रमोद बाविस्कर, जया नेरे व काव्यप्रेमी राज्य समिती, विभागीय समिती, जिल्हा समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती काव्यप्रेमी शिक्षक मंच, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष विजय जोशी यांनी दिली.

 408 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.