फेरीवाले, रिक्षाचालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना कधी मदत करणार?

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राज्यसरकारला सवाल

पुणे : राज्य सरकार सगळ्या विषयात हात झटकून केंद्र सरकारवर जबाबदारी टाकत आहे. पण राज्यातील फेरीवाले, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक पॅकेज देणार आहे का नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पुणे शहर भाजपा, लायन्स क्लब इंटरनॅशनल, स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्यावतीने एम. आय.टी. कॉलेज रोड वरील भवानीमाता मंदिर येथे रिक्षाचालकांना मोफत आरोग्य किट वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी लायन्स क्लबचे नरेंद्र भंडारी, प्रांतपाल अभय शास्त्री, सुनीता चिटणीस, कोथरुड भाजपाचे अध्यक्ष पुनित जोशी,स्मार्ट पुणे फाऊंडेशनचे रोहित शाह, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे संदीप खर्डेकर, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ.‌ संदीप बुटाला, नगरसेवक दिलीप उंबरकर, पुणे शहर चिटणीस निलेश कोंढाळकर, भाजपा नेत्या मनिषा बुटाला, संतोष रायरीकर – प्रभाग ११ अध्यक्ष, सुप्रिया माझीरे – महिला आघाडी चिटणीस, पल्लवी गाडगीळ- महिला आघाडी चिटणीस यांच्यासह परिसरातील नागरिक रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“कोरोनाच्या काळात रिक्षाचालक, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिला यांचे प्रचंड हाल झाले. त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. केंद्राने नोव्हेंबर पर्यंत रेशन दुकानातून मोफत धान्य उपलब्ध करून दिले. याशिवाय फेरीवाले आणि लघु उद्योगांना कर्ज योजना असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पण राज्य सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे का नाही?. राज्य सरकार फेरीवाले, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला यांना मदतीसाठी आर्थिक पॅकेज केव्हा जाहीर करणार,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या कार्यक्रमात लायन्स क्लबचे अभय शास्त्री यांनी चंद्रकांत पाटील यांना क्लबचे मानद सदस्य होण्याची विनंती केली. पाटील यांनी त्याला मान्यता देत मानद पदाचा स्विकार केला. तर पाटील यांच्या हस्ते संदीप खर्डेकर आणि डॉ. संदीप बुटाला यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या सामाजिक कार्याचा लायन्स क्लबच्या वतीने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात लायन्स क्लबचे नरेंद्र भंडारी, अभय शास्त्री, संदीप खर्डेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

 423 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.