ठाण्यात बारा बलुतेदारांची निदर्शने


आरक्षणासाठी धनगर, मराठा आंदोलनापेक्षा उग्र आंदोलन छेडणार – राठोड
ठाणे : ओबीसीमधील अतिमागासांना मिळणाऱ्या आरक्षणाचे फायदे आज पर्यंत मिळाले नाहीत. परिणामी, राज्यातील बारा बलुतेदार समाज मोठ्या प्रमाणात विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळे या बलुतेदारांना स्वतंत्र ४ टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी ओबीसी, भटकेविमुक्तांचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या ठिकाणी लाक्षणीक उपोषण करण्यात येणार होते. मात्र, कोरोनामुळे प्रशासनाने परवानगी नाकारल्याने बलुतेदारांनी निदर्शने केली.
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरव, कुंभार, कासार, मिस्त्री, लोहार, न्हावी, पांचाळ, धोबी, शिंपी, सोनार, वाडी – खाती, सोनार-बंजारा समाजातील नागरिकांनी “आरक्षण आमच्या हक्काचे.. नाही कोणाच्या बापाचे”, ४ टक्के स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवे, अशा घोषणा देत डफडी वाजवत हे आंदोलन केले.
यावेळी हरीभाऊ राठोड यांनी सांगितले की, राज्यातील बारा बलुतेदार समाजाला सद्या १९ टक्के आरक्षणामध्ये आहे, परंतु या १९ टक्के आरक्षणामध्ये त्यांना कुठलाही लाभ मिळत नाही, कारण ओबीसी मधल्या ज्या पुढारलेल्या जाती आहे, ह्या संपूर्ण आरक्षणाचे लाभ उचलत आहे, म्हणून १९ टक्के आरक्षणा मधून वेगळे ४ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे; अन्यथा, मराठा आणि धनगर समाजाने पुकारलेल्या आंदोलनापेक्षा अधिक तीव्र आंदोलन महाराष्ट्रात छेडले जाईल, असा इशारा, माजी खासदार व माजी आमदार तथा आरक्षणाचे अभ्यासक, हरिभाऊ राठोड यांनी दिला.
यावेळी रामदास राठोड, आप्पासाहेब भालेराव, प्रा.प्रकाश सोनवणे, प्रा. नागोराव पांचाळ, डॉ.पी.बी.कुंभार, अरुण शिंपी, प्रताप गुरव, रंजन दीक्षित, पराग अहिरे, बाबूसिंग कडेल, विजय बिरारी आदी उपस्थित होते.

 461 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.