बिल्डरच्या मनमानी पार्किंग धोरणाविरोधात बच्चे कंपनी व महिलांचे अनोखे आंदोलन

प्रभात फेरी, थाळीनाद व मानवी साखळी बनवून संविधानिक मार्गाने केला विरोध
मुंबई : मुंबईमध्ये बिल्डर म्हणजेच विकासक व रहिवाशी यांच्यातील वाद नवीन नाही, रहिवाशांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे आजही मुंबईत अनेक संकुलात आंदोलने होत आहेत, यामध्ये काही प्रकरणे माननीय न्यायालयाच्या देखरेखीखाली प्रलंबित आहेत. असेच एक प्रकरण अंधेरी (पूर्व) मरोळ मरोशी येथील वसंत ओऍसिस या प्रसिद्ध संकुलात गेली अनेक महिने सुरु असून काल विजयादशमीचा मुहूर्त साधून येथील नागरिकांनी सत्याग्रहाचा अवलंब करून विकासकाविरोधात अनोखे आंदोलन केले यामध्ये महिला व मुलांचा विशेष सहभाग होता. विकासकाने पोडियम म्हणजेच नागरिकांना चालण्याची, मुलांना खेळण्यासाठी तसेच सायकल चालविण्यासाठी असलेल्या मोकळ्या जागेमध्ये स्टँग पार्किंग म्हणजेच वन प्लस वन पार्किंग करण्याचे ठरविले आहे व या विरोधात येथील नागरिक संविधानिक मार्गाने विरोध करीत आहेत. काल विजयादशमीच्या दिवशी येथील मुलांनी काळे झेंडे घेऊन ही जागा पार्किंग मुक्त करण्यासाठी प्रभात फेरी काढली यामध्ये ५  ते १२ वर्षांच्या मुलांचा सहभाग होता, तसेच यावेळी येथील महिलांनी व मुलांनी  मानवी साखळी करून आपला विरोध प्रकट केला व दुपारी १२ वाजता थाळीनाद आंदोलन केले यामध्ये रहिवाश्यांनी आपल्या बाल्कनीत येऊन थाळीनाद केला. विकासकाने या जागेवर पार्किंग करू नये यासाठी महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिका यांच्यासोबत येथील रहिवाशी पाठपुरावा करीत असून या पार्कींगसाठी मुंबई महानगर पालिकेने कोणतीही परवानगी दिली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे व ही लढाई आम्ही संविधानिक मार्गानेच जिंकू असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला. गेल्या सहा महिन्याच्या लॉकडाउन काळामध्ये आपले आरोग्य स्वस्थ राहणे किती महत्वाचे आहे याची जाणीव प्रत्येक मुंबईकराला झालीच आहे त्यामुळे मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना निवाऱ्यासाठी लागणाऱ्या जागेसोबतच आरोग्य राखण्यासाठी पूरक अशा सुविधा म्हणजेच खेळाची मैदाने, जॉगिंग  ट्रॅक, सायकल  ट्रॅक , समाजजीवनासाठी बंदिस्त व मोकळी जागा (हॉल) शुद्ध हवा मिळण्यासाठी झाडांची लागवड करणे गरजेचे झाले आहे. गेल्या काही वर्षात अशा सुविधा देणारे अनेक विकासक नावारुपाला आले व त्यांनी रहिवाशी संकुलामध्ये मुलांसाठी मैदाने, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक तसेच जेष्ठ नागरिकांसाठी मेडीटेशन व योग सुविधा केंद्र सुरु केले व अशा संकुलांना मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे परंतु या संकुलाच्या आतील मोकळ्या जागेत विकासक अतिक्रमण करीत असल्याचे दिसून आल्यामुळे मुंबईकरांना एका वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

 772 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.