देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण

अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर झाले होम क्वारन्टाईन

मुंबई : कोरोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत.
फडणवीस यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी,’ असे फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस सातत्याने कार्यरत आहेत. कोरोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात ते सातत्याने राज्यात दौरे करत होते. गेल्या सात महिन्यांत त्यांनी जिल्ह्याजिल्ह्यातील अनेक रुग्णालयांना भेटी दिल्या. तेथील परिस्थिती जाणून घेतली. याशिवाय, कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळानंतर त्यांनी कोकणचा दौरा केला होता. पक्षाने बिहार निवडणुकीची जबाबदारी टाकल्यानंतर ते बिहारलाही जाऊन आले होते. अलीकडेच त्यांनी अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुणे व सोलापूरचा दौरा केला होता. या दौऱ्यांतून त्यांचा अनेकांनी संपर्क आला होता. त्यातूनच त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 288 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.