देखभाल-दुरुस्तीच्या कामांसह गरजूना तात्काळ वीजजोडणी

महावितरणचा ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम

कल्याण : देखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित वीज पुरवठा तसेच ग्राहकांशी संवाद या उद्देशाने महावितरणच्या कल्याण परिमंडलात  ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम सुरु झाला आहे. या उपक्रमात प्रत्येक शाखा कार्यालयांतर्गत एका गावाची निवड करून त्या गावातील देखभाल-दुरुस्तीची कामे अधिक मनुष्यबळाच्या मदतीने एकाच दिवसात पूर्ण करण्यात येतात. तसेच गरजूंना जागेवर वीजजोडणी देण्याची अतिरिक्त सुविधाही पुरविण्यात येत आहे. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली क्रमाक्रमाने सर्वच गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
पालघर विभागातील तलासरी व डहाणू उपविभागात १९ ऑक्टोबरला रायपूर ग्रामपंचायत अंतर्गत रायपूर पाडा, बेडगाव, आष्टा व चारोटी शाखेतील तवा नवापाडा तसेच २२ ऑक्टोबरला गिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत घिमानियापाडा, पारसपाडा, नारायण ठाणे, डोंगरपाडा, लिजतपाडा आदी ठिकाणी ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम राबवण्यात आला. यात गंजलेले व खराब झालेले १२ विजेचे खांब बदलण्यात आले. वीजवाहिनीच्या ढिल्या पडलेल्या तारांना आवश्यक ताण देणे, रोहित्रातील फ्युज व किटकॅट नवीन ठाकणे, जम्पर्स बदलणे, तारांमध्ये स्पॅन स्पेसर टाकणे, तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविणे आदी देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आली.
 याशिवाय या उपक्रमात वीजबिल व मीटर रीडिंगच्या तक्रारींचे निवारण व गरजूना किमान कागदपत्रांच्या आधारे जागेवर वीजजोडणी देण्यात आली. महावितरणच्या ऑनलाइन सुविधा व मोबाईल अँपची माहिती देऊन या सुविधांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. तसेच वीजचोरी हा अजामीनपात्र व शिक्षेस पात्र असलेला दंडनीय अपराध असल्याबाबत माहिती देऊन ग्रामस्थांना सावध करण्यात आले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून उपक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. अधीक्षक अभियंता किरण नगांवकर व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या नेतृत्वाखाली तलासरीचे उपकार्यकारी अभियंता यादव इंगळे आणि डहाणूचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र धोडी यांच्या टीमने या उपक्रमात सहभाग  घेतला.

 259 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.