ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे : गटई व्यवसायासाठी ठाणे महानगर पालिकेने मंजूर केलेल्या गटई स्टॉलमध्ये चक्क पानाची टपरी चालविली जात असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, ठाणे नगर पोलिसांनी या गटई स्टॉलवर छापा मारुन मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
ठाणे बाजारपेठेतील टॉवर नाका येथे जनसेवा चप्पल मार्ट नावाचे दुकान आहे. हे दुकान गटई व्यवसायासाठी देविदास अहिरे यांना मंजूर झाले आहे. मात्र, सध्या ते दुकान चालवित नाहीत. या दुकानामध्ये चप्पल शिवण्याचा व्यवसाय करणे सक्तीचे असतानाही येथे चक्क पानाची टपरी उघडण्यात आली आहे. या टपरमध्ये गुटखा विकला जात असल्याची माहिती पोलीस शिपाई रोहन पोतदार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाराते, पोलीस नाईक शिंदे आणि पोलीस शिपाई पोतदार यांनी छापा मारला. या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात पानमसाला आणि गुटख्याचा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दुकानचालक देवेंद्र राधेश्याम पांडेय याच्यावर भादंवि १८८,२७२,२७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, देविदास अहिरे यांना हा स्टॉल मंजूर करण्यात आला असूनही संतोष अहिरे नामक इसमाकडून हा स्टॉल देविदास पांड्ये याने भाडेतत्वावर चालविण्यास घेतला होता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाराते हे करीत आहेत.
487 total views, 3 views today