यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुंबई : कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली.
न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपाची मागणी कायम आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. परंतु, मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात. राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे व यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले की, वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील व त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर अजूनही मंत्रिपदी कायम आहेत, याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते.

 486 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.