नवी मुंबईत ७३ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेच्या पोटातील अल्सरवर यशस्वी शस्त्रक्रिया

लॉकडाउनमध्ये जेष्ठ नागरिकांमध्ये वाढल्या पोटविकारांच्या समस्या                                                                       नवी मुंबई : कोरोनाचा फैलाव मुंबई, नवी मुंबई या शहरालगतच्या वस्तींमध्ये वाढत असून कोरोनासोबतच इतर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान डॉक्टरां समोर उभे राहत आहे. लॉकडाउन काळामध्ये जेष्ठ  नागरिकांमध्ये आरोग्याच्या  अनेक समस्या आढळून आल्या  आहेत यामध्ये  सर्वात जास्त पोटाच्या विकारांमध्ये  वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बैठी जीवनशैली, अयोग्य आहार आणि मानसिक असंतुलन ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. आम्लपित्त हा वरून साधा दिसणारा आजार असला तरी वेळीच दखल न घेतल्यास गंभीर स्वरूप धारण करतो, अशीच एक घटना नवी मुंबई येथे घडली परंतु वेळीच उपचार केल्याने  रुग्णाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.  नवी मुंबई वाशी येथे राहणाऱ्या एका ७३ वर्षीय महिलेच्या पोटातील अल्सर फुटल्यामुळे तिची अवस्था फारच बिकट झाली होती. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे उदरविकारतज्ञ व लॅप्रोस्कॉपीक शल्यविशारद डॉ.नितीन तवटे म्हणाले, ” चारुशीला प्रधान ( नाव बदलले आहे) ( वय ७३)  यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते परंतु त्याना गेल्या तीन महिन्यापासून अल्सरचा त्रास सुरु होता त्यातच त्यांना उच्च मधुमेह असल्यामुळे शरीरामधील ऑक्सिजनची पातळी खाली आली होती, त्यांच्या पोटातील  मोठ्या आतड्यामध्ये असलेला अल्सर फुटल्यामुळे त्यांची प्रकृती अधिक खालावली  अशा परिस्थिती मध्ये शस्त्रक्रिया करणे हा एकच पर्याय उपलब्ध असतो परंतु रुग्णाचे वय व  वाढलेल्या मधुमेहाचे प्रमाण पाहता भूल देण्यासाठी विशेष कौशल्य वापरावे लागते तसेच चारुशीला यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाला असल्याने तसेच कोरोना चाचणी सुद्धा पॉजीटीव्ह आल्यामुळे ही शस्त्रक्रिया फारच आव्हान देणारी होती, परंतु आमच्या संपूर्ण टीमने आपले कौशल्य पणाला लावून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. तिच्या पोटातील अल्सर पूर्णपणे साफ करून कोलोस्टोमी करून तिच्या शौचास वाट करून दिली. अल्सर फुटल्यामुळे तिचे शौच व मलमूत्र अल्सर मधून बाहेर येत होते.” पोटात आतून व्रण पडण्याच्या स्थितीला पोटाचा अल्सर असे म्हटले जाते. समस्या वाढवल्यावर हे व्रण मोठे होतात आणि जखमा होतात. यामुळे जास्त समस्या होऊ शकते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे जेव्हा पोटात जास्त आम्ल  तयार होते, तेव्हा हा आजार होतो. यासोबतच पोटातील बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे ही समस्या होऊ शकते. जेष्ठ नागरिकांमध्ये या समस्या जास्त प्रमाणात दिसून येतात त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केल्यास गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत नाही. ज्येष्ठ नागरिकांना करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वयोमानानुसार कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती हे महत्त्वाचे कारण असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब,पोटाचे विकार,मूत्रपिंडाशी संबंधित आजार, दमा किंवा श्वसनाचे विकार आदी व्याधी असतात. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी या विषाणूच्या संसर्गापासून जेष्ठ नागरिकांना वाचविणे हे एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.

 317 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.