भूमीगत पार्किंगसह गावदेवी मैदानाचाही विस्तार करा

आमदार संजय केळकर यांची पालिका प्रशासनाला सूचना

ठाणे : ठाण्यातील गावदेवी मैदानाखाली होत असलेल्या भूमीगत पार्किंगमुळे मैदानाचे क्षेत्र घटण्याची स्थानिकांची भिती महापालिकेच्या दाव्यानंतर फोल ठरली आहे. तरीही, याची दखल घेत भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर यांनी गावदेवी मैदानाची पाहणी केली.गावदेवी मैदानात उभारण्यात येत असलेल्या भूमिगत पार्किंग प्लाझामुळे मैदानाचा आकार कोणत्याही प्रकारे कमी होऊ न देता मैदानातील इतर बांधकामे दुर करून मैदान विस्तारण्याच्या सुचना केळकर यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. 
 ठाण्यातील गावदेवी मैदानाबद्दल स्थानिक रहिवाशांना विशेष जिव्हाळा असून दाट लोकवस्तीतील या मैदानात क्रिडाप्रेमींचेही हक्काचे खेळण्याचे ठिकाण आहे. जाहीर राजकीय सभा, संमेलने, क्रीडास्पर्धा, नववर्षाची भव्य रांगोळी आणि वृक्षवल्लीसारखे पर्यावरणस्नेही प्रदर्शनेही या मैदानामध्ये आयोजित करण्यात येत होती. ठाणेकरांच्या विरंगुळ्याच्या या मैदानामध्ये २०१५ साली भुमीगत पार्किंग प्लाझा तयार करण्याचा प्रस्ताव तयार करून स्मार्ट सिटी अंतर्गत त्याची उभारणी करण्याची निश्चित करण्यात आले. स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारेच विश्वासात न घेता आणि त्यांना या वाहनतळाची खरच गरज आहे का याची चाचपणीही न करता हा सुमारे २९ कोटी रुपयांच्या या प्रकल्पास गती देण्यात आली. मात्र, यामुळे मैदानाचे अस्तित्व नष्ट होण्याची भिती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्याने आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी या मैदानाची पाहणी केली. तसेच, मैदानाचे क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सुचना प्रशासनाला केल्या. यावेळी भाजपचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील आणि महापालिकेचे अभियंता विकास ढोले, प्रविण पापळकर आदी उपस्थित होते.

 504 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.