मंदिरे उघडण्यासाठी भाजपाचे लाक्षणिक उपोषण

घंटाळीदेवी मंदिराबाहेर घंटानादाचाही गजर

ठाणे : राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलनानंतरही महाविकास आघाडी सरकारला जाग न आल्याने, भाजपाने आज लाक्षणिक उपोषण केले. ठाण्यातील घंटाळीदेवी मंदिराबाहेर उपोषणाबरोबरच घंटानादाचाही गजर करण्यात आला. या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांप्रमाणेच मोठ्या संख्येने भाविकही सहभागी झाले होते.
राज्यात एकिकडे मदिरालये उघडली असताना, मंदिरे बंद आहेत. यापूर्वीच्या आंदोलनानंतरही राज्य सरकारला जाग येत नाही. त्यामुळे भाजपातर्फे राज्यभरात प्रमुख मंदिरांसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ठाण्यातील २०० वर्षांच्या पुरातन घंटाळी देवी मंदिरासमोर भाजपा व आध्यात्मिक आघाडीच्या वतीने उपोषण करण्यात आले. या वेळी भाजपाचे आमदार व ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, प्रदेश सचिव संदिप लेले, नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास घांग्रेकर यांची उपस्थिती होती. या उपोषणाला सामान्य नागरिकांचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
`कोरोना’ आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी मंदिरे उघडण्याची आवश्यकता आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार मंदिरे उघडण्याचा निर्णय घेत नाही, हे दुर्देव आहे. धार्मिक स्थळांवरील नागरिकांचा आर्थिक गाडा बंद पडलेला आहे. त्यामुळे मंदिरे तातडीने उघडावीत, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसह सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जातात. मात्र, त्यांनी तेच सिद्धिविनायक मंदिर बंद केले आहे, अशी टीका विकास घांग्रेकर यांनी केली.

 496 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.