त्यांच्याकडून ५ लाख ७ हजाराचा दंड वसूल

मास्क न लावणा-याविरूद्ध महापालिकेची कारवाई

ठाणे : विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या व्यक्तीविरूद्ध ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये मास्क न वापरणाऱ्या १०१५ व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई करून आजपर्यंत ५ लाख ७ रूपयांचा दंड वसूल केला. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई सुरू असून यापूढे देखील शहरात सदरची कारवाई सुरु राहणार आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये या ठिकाणी अनेक व्यक्ती विना मास्क संचार करतानाचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी त्याबाबतचा आदेश काढला होता. या आदेशनुसार महापालिका क्षेत्रात मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई सुरु आहे.
महापालिका हद्दीमध्ये १२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या एकूण १०१५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतंर्गत एकूण ५ लाख ७ हजार ५०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.
यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये ७० हजार दंड वसूल करण्यात आला. वर्तकनगरमधून ३८ हजार तर लोकमान्यनगर-सावरकर प्रभाग समितीमधून ३५ हजार दंड वसूल करण्यात आला. वागळे प्रभाग समितीमधून ४७ हजार, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत १ लाख २० हजार तर कळवा प्रभाग समितीमधून ३३,हजार ५०० एवढा दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये या कारवाईमध्ये एकूण ८१,७०० एवढा दंड वसूल केला तर दिवा प्रभाग समितीमध्ये एकूण २४,०००एवढा दंड वसूल करण्यात आला.

 524 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.