यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सन २०२०-२१ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली.

लता दिदींच्या वाढदिवसानिमित्त सरकारकडून जागतिक दर्जाच्या संगीत महाविद्यालयाची भेट

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सन २०२०-२१ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली.
उषा मंगेशकर यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. सुबह का तारा , जय संतोषी मां , आझाद , चित्रलेखा , खट्टा मीठा ,काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर , इनकार अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गायलेल्या लावण्यांमधील गावरान ठसका रसिकांना विशेष भावला. त्यांनी गायलेली असंख्य भावगीते, भक्तिगीते अतिशय लोकप्रिय आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी उषाताईंचे पुरस्काराबददल अभिनंदन केले आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार शासनाने आपल्याला प्रदान करण्याचे घोषित केल्याबद्दल, उषाताई मंगेशकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. गायन व संगीत या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या कलाकारास राज्य शासनातर्फे सन १९९२ पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येते. संगीतकार राम – लक्ष्मण, उषा खन्ना, उत्तम सिंग, प्रभाकर जोग, गायिका सुमन कल्याणपूर, आशा भोसले, पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले यांसारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

लता दिदींच्या वाढदिवसानिमित्त सरकारकडून जागतिक दर्जाच्या संगीत महाविद्यालयाची भेट
गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  मुंबईत ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची निर्मिती होईल. नव्या पिढीचे गायक, संगीतकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे  देशातले पहिले संगीत महाविद्यालय लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. मंगेशकर कुटुंबियांचा संगीत क्षेत्रात असलेला वारसा पुढे नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, वादक आणि संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणारे कलाकार तयार होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.महाविकास आघाडी सरकारकडून लता दीदींना वाढदिवसानिमित्त भेट म्हणून निर्णय घेतला आहे. त्यांनाही हा निर्णय नक्कीच आवडेल. या संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातील कलाकार येत्या काळात तयार होतील अशी आशा व्यक्त करून सांगून सामंत यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

 407 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.