कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा भोंगळ कारभार

पालिकेच्या स्पर्धांमधील पंच मानधनापासून वंचित

कल्याण : एकीकडे फिट इंडियाचा नारा दिला जात असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून मात्र क्रीडा विषयक धोरणांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप क्रीडा शिक्षकांनी केला आहे. पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील पंच अद्यापही मानधनापासून वंचित राहिले आहेत.
शासनाच्या आदेशाने आंतरशालेय क्रिडा स्पर्धांकरीता महापालिकांना जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा व क्रीडा विषयक जागरूकता निर्माण व्हावी या मूळ उद्देशाने अनेक महापालिकांनी या स्पर्धा आपल्या क्षेत्रात राबविल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत घेण्यात आलेल्या ४९ प्रकारच्या खेळात सुमारे २५ हजार विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. सदरच्या स्पर्धा जुलै २०१९ ते जानेवारी २०२० य कालवधीत पार पडल्या. या स्पर्धा यशस्वी करण्या करीता सुमारे १०० ते ११० पंचानी केलेल्या कामाचा मोबदला अद्यापही पालिका प्रशासनाकडून दिला गेलेला नाही.
कोरोना महामारीच्या काळात अनेक पंचांच्या घरची परिस्थिती हालाकीची असून पालिकेचा क्रीडा विभाग परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता चाल ढकल करण्याच्या भूमिकेत आहेत. क्रीडा विभागात अनेक चकरा मारून देखील क्रीडा विभागाकडून या पंचांना प्रशासकीय डावपेचात अडकवत आहे.पालिकेकडून अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जाते व तेही वेळेत न मिळाल्याने पालिका क्षेत्रातील पंच मंडळी नाराज असून यापुढे पालिकेकडून घेण्यात येणाऱ्या क्रिडा स्पर्धाना सहकार्य न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
दरम्यान याबाबत क्रीडा विभागाचे उपायुक्त जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, पंचाच्या मानधनाविषयी माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती दिली.

 427 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.